बार्शी- बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन आणि आडत व्यापारी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. पोलिस प्रशासनाने व्यापाऱ्यांचा बंद मिटवण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. उलट व्यापाऱ्यांनी ताठर भूमिका घेत बुधवारी (दि. ४) शहर बंद पुकारला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या भूमिकेच्या विरोधात जनहित शेतकरी संघटना आणि शिवसेनेने बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा बाजार समितीवर मोर्चा काढला. त्यांनी चार दिवसांत संप मागे घेतल्यास हाती रूमणे घेऊ, असा इशारा दिला आहे.
अतिक्रमण हटाव, खरेदीतील गैरप्रकार याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने ३० सप्टेंबरपासून आडत व्यापाऱ्यांनी सौदे बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांची सोमवारी बैठक बोलावली होती. परंतु व्यापारी आपल्या मतावर ठाम राहिले.