आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीएमओ’मुळे महिलेस मिळाले जीवदान; शस्त्रक्रियेसाठी मिळाली २५ हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- आजारपणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बार्शीतील एका कुटुंबाला पंतप्रधान सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट व आप्तस्वकीयांनी केलेली मदत एका कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली. या मदतीमुळे हृदयविकाराने मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेचे प्राण वाचले. एरव्ही सरकारी यंत्रणेकडून सामान्य जनतेला मिळणारा प्रतिसाद हा वेळकाढूपणा असतो. परंतु एक महिन्याच्या आत पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीबाबत आलेला अनुभव जनतेच्या मनात सरकारी यंत्रणेविषयी आदर वाढवणारा ठरला आहे. राजश्री राजेंद्र वालवडकर (वय ४५, रा. शिवाजीनगर, बार्शी) यांना हा सुखद अनुभव आला.

वालवडकर दांपत्य बार्शीत भेळचा गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गुढीपाडव्याला राजश्री यांना हृदयविकाराचा झटका अाला. त्यांच्या हृदयाची एक झडप निकामी झाली. पती राजेंद्र यांना मणक्याच्या आजारामुळे भेळचा गाडा बंद करावा लागला. राजश्री यांचे रोगनिदान व औषधोपचार यातच ५०- ६० हजार रुपयांचे कर्ज झाले. हृदयशस्त्रक्रिया हाच यावर उपाय हाेता, मात्र त्यासाठी आणखी ४० ते ५० हजारांचा शस्त्रक्रियेसाठीचा खर्चही या कुटुंबाला पेलवणारा नव्हता. आर्थिक मदतीसाठी राजेंद्र वालवडकर यांनी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. खासदार गायकवाड यांनी या कुटुंबास पंतप्रधान सहायता निधीतून मदतीसाठी शिफारस केली. सहायता निधीच्या निकषानुसार कमाल २५ हजार रुपयांचा निधीही यासाठी मंजूर झाला. महिन्यात कार्यवाही पूर्ण होऊन ११ जुलै रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात राजश्री यांच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया झाली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे.
राजेंद्र यांनीही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार विविध योगासने व व्यायामातून मणक्याच्या आजारावर काहीअंशी मात केली. रोगनिदानाच्या िवविध चाचण्या, औषधोपचार यामुळे अजूनही सुमारे सव्वा लाखाचा बोजा या कुटुंबावर आहे.

पीएमओचे पत्र : तुम्हीही मदत करा
पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे पत्र वालवडकर कुटुंबीयांस प्राप्त झाले. हृदय शस्त्रक्रियेतून दुरुस्त होऊन कुटुंबीयांस आनंद मिळावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपणास मिळालेला निधी हा पंतप्रधान सहायता निधीमधून दिलेला असल्याने आपणही समाजातील अडचणीत असलेल्या व्यक्तींना साहाय्य करण्याचे आवाहन या पत्रात करण्यात
आले आहे.
अनेक दानशूरांचे सहकार्य
खासदार रवींद्र गायकवाड यांचे पंतप्रधान सहायता निधीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. सिद्धिविनायक ट्रस्ट व समाजातील आप्तस्वकीय, दानशूरांचे सहकार्य मिळाले. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच ही अवघड शस्त्रक्रिया होऊ शकली. उस्मानाबादचे डॉ. भारत माने व अश्विनी रुग्णालयातील डॉ. अनुपम शहा या सर्वांचा मी आभारी आहे. - राजेंद्र वालवडकर, बार्शी
उपयोगी पडल्याचा आनंद
वालवडकर कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार तत्काळ आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला पंतप्रधान सहायता निधीतून मदत मिळवून देऊन दिलासा देऊ शकलो याचा मनस्वी आनंद आहे. समाजातील खऱ्या गरजवंतांना यापुढेही मदत करण्यासाठी यापुढेही आपण प्रयत्नशील राहू. -रवींद्र गायकवाड, खासदार
बातम्या आणखी आहेत...