आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळांना देणार प्राथमिक सुविधा, महापालिका पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदाच झाली शिक्षण मंडळात बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवणे, तेथे भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या शाळांच्या परिसरात अतिक्रमण असेल तर ते काढण्यात येतील, असे सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितले. पालिकेच्या शाळांची माहिती घेण्यासाठी ते महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आले होते. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
 
महापालिका शिक्षण विभागाकडे नेहमी दुर्लक्ष होते. अलीकडील काळात मनपा पदाधिकारी या मंडळाच्या कार्यालयात आले नव्हते. सत्तांत्तर झाल्यानंतर प्रथमच शनिवारी बैठक झाली. या वेळी मनपा सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, शिक्षण मंडळाचे सदस्य दत्तात्रय गणपा, प्रा. व्यंकटेश कटके, जाबीर अल्लोळी, जावीद खैरदी, पांडुरंग चौधरी, शशिकांत थोरात, संध्या गायकवाड, केदार मेंगाणे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधा साळुंके आदी उपस्थित होते.
 
मुख्याध्यापकांनी शाळेच्या परिसरात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. भौतिक सुविधा आणि शिक्षणांचा दर्जा वाढवण्यासाठी केलेेले प्रयत्न सांगितले. लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. शाळेची रंगरंगोटी आदी कामे केल्याचे सांगण्यात आले. शाळा परिसरात बोअर मारून पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली.

शाळेची जागा लाटण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय अनेक मनपा शाळा परिसरात अतिक्रमण झाले. ते काढण्याबाबत सूचना करण्यात आले. यावेळी गणपा, अल्लोळी, प्रा. कटके आदींनी मनोगत व्यक्त केले.
 
सभागृह नेते सुरेश पाटील म्हणाले, शाळा परिसरात कोणी राजकीय वजन वापरून अतिक्रमण काढत असेल तर ते तत्काळ काढण्यासाठी महापालिका प्रशासनास सांगू. शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण झाले असेल तर ते काढले पाहिजे. अनेक शाळा परिसरात घाण अाहे. ते स्वच्छ केले जाईल. महापालिका बजेटमध्ये सुचवलेल्या ऐच्छिक खर्चात कपात करण्यात येईल. शाळेच्या परिसरात बोअर मारून तेथे पाण्याची सोय करण्यात येईल. महापालिकेत शिक्षण मंडळाचे बजेट करण्यापूर्वी सर्वांचे मत घेतले जाईल. आताची मागणी केली ती लेखी स्वरूपात द्यावी, असे पाटील म्हणाले. यावेळी शिक्षक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...