आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट बुक करताना सतर्क राहा; नाहीतर सर्व सवलतींना मुकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-तिकीट काढत असाल तर थोडे सावध राहावे लागणार आहे. कारण, आयआरसीटीसीने अशा नागरिकांसाठी तिकिटावर दिली जाणारी सवलत मिळावी म्हणून वेबसाइटवर केलेल्या रचनेमुळे गफलत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात तिकीट बुकिंगनंतर संबंधितांना शब्दांचा भ्रम होत असल्याने अशा तिकिटांवरील सवलतीपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. ऑनलाइन तिकीट काढताना स्क्रीनवर आलेल्या पर्यायांवर सर्व माहिती िदल्यानंतर शेवटी एक विंडो येते. त्यात तुम्हाला सवलतीबाबतची विचारणा होईल. त्याच्या खाली ओके व कॅन्सलचादेखील पर्याय दिला जाईल. ओकेचा अर्थ तुम्ही जर सवलत चालू ठेवायची आहे असा काढाल तर त्याच ठिकाणी तुमची गफलत होईल. तुम्हाला मिळणारी सवलत रद्द होऊन तिकिटाची पूर्ण रक्कम भरावी लागेल. आयआरसीटीसीच्या वेबवरील या ऑप्शनमुळे रोज हजारो प्रवाशांना भुर्दंड पडत आहे. त्यामुळे सावध राहून ओके पर्याय न निवडता कॅन्सल पर्याय निवडणे शहाणपणाचे ठरणार आहे. 
 
देशात राेज सुमारे अडीच ते तीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यातील ६० ते ६२ टक्के प्रवासी ऑनलाइन तिकिटावर प्रवास करतात. आयआरसीटीसीचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून समाजातील विविध घटकांना तिकिटांवर सवलत दिली जाते. यात ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ६० वर्षे वय असलेल्या पुरुषांना तिकिटावर ४० टक्के, तर ५८ वय असलेल्या स्त्रियांना ५० टक्के सवलत दिली जाते. रेल्वे नियमाप्रमाणे सवलतीच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण होऊ नये म्हणून होय किंवा नाही या शब्दांचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र आयआरसीटीसीकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

लक्षात आणून देऊ  
आयआरसीटीसीमुळे प्रवाशांची फसवणूक होत असेल तर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर निश्चित आयआरसीटीसीवर कारवाई केली जाईल. ही बाब रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यादेखील लक्षात आणून देऊ.'
- डॉ. अशोक त्रिपाठी, सदस्य, प्रवासी सेवा समिती, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...