पंढरपूर- आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले असतानाही उद्योगपती अविनाश भोसले आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यासह
आप्त, हेलिकाॅप्टरचा पायलट व नोकर अशा २८ जणांना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास थेट विठ्ठल दर्शनाची साेय उपलब्ध करून देण्यात अाली. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमधून संताप व्यक्त हाेत अाहे.
आषाढीचा सोहळा चार दिवसांवर आल्याने राज्यासह अन्य राज्यांमधील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. सध्या दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पाच ते सहा पत्राशेड भरुन पुढे गेली असून त्यात अबालवृद्ध भाविक उभे आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन २१ जुलैपासून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन पास बंद केले.
गुरूवारी उद्योगपती भोसले, विश्वजित कदम हे आप्तस्वकीयांसह विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत नातेवाईकच नव्हे तर हेलिकॉप्टरच्या पायलटपासून नाेकर- नाेकराणींचा लवाजमा होता. अशा २८ जणांना थेट मंदिरात प्रवेश देण्यात अाला. याबाबत काही पत्रकारांनी चाैकशी केली असता मंदिर कार्यालयाच्या नोंदवहीत त्यांच्या व्हीआयपी दर्शनाची नोंद नव्हती. पत्रकार आपल्या मागावर असल्याचे लक्षात आल्यावर कदम हे चक्क तोंडावर उपरणे बांधून मंदिराबाहेर आले. त्यानंतर भोसले व कदम यांनी पुन्हा नामदेव पायरी प्रवेशद्वाराजवळ जाऊन मंिदरात सोडण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र पत्रकार समोर असल्याने पोलिसांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शेवटी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांशी वरिष्ठ स्तरावरुन फोनाफोनी करुन या व्हीआयपी मंडळींनी अखेर गाभाऱ्यात जाऊन श्री विठ्ठल दर्शन घेतले.
अधिकार्यांचा फोन बंद
भोसले, कदम यांना वशिल्याच्या दर्शनाविषयी विचारणा करण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांना वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफ होता.