आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना विडी वळू देणार नाही..., कारखानदार करतात अन्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सव दिलाखुलास गप्पात शहरातील विडी कामगार महिलांनी व्यक्त केला निर्धार
सोलापूर दिवसागणिकहजार विड्या वळून आम्ही संसाराची जबाबदारी पेलली. मुलांचे शिक्षण केले. कष्टाच्या तुलनेने मोबदला कमी असलेल्या या विड्या वळण्याच्या व्यवसायात आमच्या पोटच्या मुलींना कधीच येऊ देणार नाही, असे मत पूर्व भागातील विडी कामगार महिलांनी व्यक्त केले. नवरात्र उत्सवानिमित्त ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आयोजित दिलखुलास गप्पा कार्यक्रमात त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

एकचपान पाच वेळा हाती
विड्यावळताना एकच पान पाच वेळा हाती येते. पान भिजविणे, पान कापणे, विडी वळणे, दोरा बांधणे आणि पुन्हा त्यांचा कट्टा बांधणे, असे करत विडी तयार होते. कष्टाच्या मानाने पगार नाही. रोज १४० रुपये मिळतातच, असे नाही. त्यात पान कमी असेल तर त्यासाठी पैसे देऊन पान विकत घ्यावे लागते. पुन्हा विड्या निवडून घेताना त्या छाटल्या जातात. सर्व खर्च जाऊन पदरी ८० रुपयेच पडतात. त्यातही आरोग्य जपून हे काम करणे महत्त्वाचे ठरते.

शाहीन शेख, विडीकामगार माझे शिक्षण कन्नड भाषेतून पाचवीपर्यंत झाले. लग्नानंतर जैनुद्दिन चाळ सोलापूर येथे राहायला आले. शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी पलनाटी यांच्यामुळे विड्या करायला सुरुवात केली होती. त्यावेळी बारा आण्याला हजार विड्या वळत असे. पुढे मी स्वत:चे कार्ड करून घेतले. जाम मिल बंद पडल्यानंतर पती घरीच होते. संसाराकरिता पुढाकार घेऊन विड्यांचे काम करायला सुरुवात केली. विड्या वळत मुलाला आणि मुलीला बीए केले. त्यांची लग्ने, इतर सर्व गोष्टी विडीच्या आधारावर केल्या. शिवाय घरी बसून काम असल्याने मला घर सोडून कुठेही जावे लागले नाही. कष्टाच्या मानाने पगार नाही. कारखानदार खूप अन्याय करतात. शासनाने हजार विड्यांना २१० रुपये देण्यास सांगितले आहे. मात्र, जेमतेम १४० रुपयेच मिळतात.
विड्या वळून मुलांना शिकवले
गीताअलवाल, विडीकामगार माहेरी घरची परिस्थिती चांगली होती. आई हौस म्हणून विड्या करत असे. त्यावेळी कधी विड्या वळल्या नाहीत. बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. लग्नानंतर सासूबाईंनी विड्या करण्याचे शिकविले. पुढे या विड्यांनी आधार दिला, संसार चालविताना मदत झाली. पती टॉवेल कारखान्यात काम करतात. त्यांच्या पगारावर घर चालविणे अवघड होऊ लागले. त्यावेळी मी ठरवून विड्यांचे काम सुरू केले.
आज त्याच बळावर मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण करते आहे. भविष्यात माझ्या मुलीला या क्षेत्राकडे पाहूदेखील देणार नाही. कारण मी जे भोगले आहे ते तिच्या वाट्याला येऊ नये, अशी इच्छा आहे. घरकाम सांभाळून विडी करणे, माप देणे, तेथे होणारे मूल्यमापन आणि त्यातून होणारे नुकसान यामुळे जीव त्रासून जातो. त्यामुळे मुले या क्षेत्रात नकोच. चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार आहे.

पतीचे छत्र हरवले, विडीवळून कुटुंब सावरले
सुनीताजडल, विडीकामगार आईला विड्या वळताना लहानपणापासून पाहात होते. मात्र हेच काम माझ्या आयुष्याचा आधार बनेल असे वाटले नव्हते. लग्नानंतर पती ब्रेन ट्यूमरने गेले. एक मुलगा, एक मुलगी असा संसार होता. विड्या वळण्याचे काम करत स्वत:च्या पायावर उभी राहिले. मुलगी बारावीपर्यंत शिकली. आता मुलगा सध्या बारावीत शिकत आहे. दिवसाला हजार विड्यांचे काम असते. त्यातही कारखान्यात छाट करून हजारातून विड्या कमी केल्या जातात. त्यामुळे नुकसान होते. येण्या- जाण्याचा खर्च छाट आणि बाकी असे सगळे मिळून १४० रुपयांतून जवळपास ८० रुपयेच हाती येतात.
त्यातच घर भागवावे लागते. कसरत करावी लागते. काम नाही तर पगार नाही. शिवाय कशाची हमीही नाही. इतर सुविधांचाही लाभ नाही. कष्टाच्या तुलनेने खूप कमी पगार आहे. मी या कामात झिजले मात्र मी मुलींला कपड्याच्या दुकानात काम कर पण विड्या नको, असे सांगून दुकानात कामाला लावले आहे. मुलांना या क्षेत्रात आणायचे नाही, असा निश्चय केला आहे.