आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सोलापूर शहरात शौचालय उभारणी अभियानात अंधश्रद्धेचा मोठा अडसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर  महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सुरू केलेल्या शौचालय योजनेला अंधश्रद्धेचा अडसर आला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमच्या घरात  गर्भवती महिला असताना खड्डा खाेदत नाहीत, असे सांगून पिटाळले जात आहे. त्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्याच्या  मोहिमेवर असलेल्या  अधिकाऱ्यांना १०० पैकी १० घरांत असा अनुभव येत असल्याने शौचालय उभारणीच्या कामात अडथळे येत आहेत. शहरात १४,९३३ शौचालय उभारणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १४७५ शौचालये रखडली आहेत. त्यात पूर्व भागातील १०९५ शौचालये रखडली आहेत.
 
सोलापूर शहराच्या पूर्व भागात तेलगू समाज मोठ्या प्रमाणात आहे. घरात गर्भवती असताना बांधकाम केल्यास वा खड्डा खोदल्यास महिला व बाळाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो, अशी पूर्वापार अंधश्रद्धा या समाजात आहे. सोलापुरात सध्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीची मोहीम सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना तेलगू समाजाच्या वयस्कर महिला, आमच्या घरात शौचालय बांधता येणार नाही. कारण आमच्या घरात गर्भवती महिला आहे. त्यामुळे बाळंतपण  झाल्यानंतर शौचालयाची  योजना द्या, असे स्पष्ट शब्दांत सुनावत आहेत. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी कशी करावी व हा पेच कसा सोडवावा, असा प्रश्न स्वच्छ भारत अभियानच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतावतो आहे.    
 
अडचणीचा पेच :  शहरात घर तिथे शौचालय असा उपक्रम राबवत असताना आरोग्य  विभागाच्या लोकांना ज्या घरात महिला गरोदर  आहेत त्यांच्या घरातून आता बांधकाम केले जाणार नाही किंवा आता ही योजना नकोच, असे सांगण्यात येते.  त्यामुळे अडचणी येतात, असे  स्वच्छ भारत मिशन अधिकारी दत्तात्रय चौगुले यांनी सांगितले.
 
एकीकडे बच्चन, तर दुसरीकडे अडचण: सध्या विद्या बालन व सुपरस्टार अमिताभ बच्चन हे स्वच्छ भारत मिशनच्या जाहिराती करताहेत. सरकारही याबाबत प्रचंड दक्ष झाले आहे. मात्र,  अंधश्रद्धेच्या या अडचणीवर कशी मात करता येईल याकडे मात्र आता लक्ष वेधले  आहे.

आम्ही बांधकाम करत नाही
आमच्या  समाजात असा समज आहे की, गर्भवती स्त्री असलेल्या घरात कोणत्याही प्रकारचा खड्डा खणला जात नाही आणि त्या घरात कोणत्याही  प्रकारचे बांधकाम केले जात नाही.  त्यामुळे अनेकदा बांधकाम पुढे ढकलले जाते. समाजातील प्रत्येक जण हे काटेकोरपणे पाळतो.
- पुष्पा पिस्के,  तेलगू समाज महिला, घरकुल परिसर
 
बातम्या आणखी आहेत...