आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरमगावच्या बहीण- भावाचा बुडून मृत्यू, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पिण्याचे पाणी आणण्यासाठी तळ्यातील मोठ्या खड्ड्यात उतरलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला. लहान भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात बहिणीलाही आपला जीव गमवावा लागला. हा प्रकार बरमगाव (बुद्रुक, ता. उस्मानाबाद) येथे रविवारी (दि. १८) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडला.

बरमगाव येथील दीपाली महादेव गायकवाड (१७) , तिचा भाऊ नितीन (१४) चेतन आपल्या कुटुंबीयांसह शेतात आले होते. शेतात कुटुंबीयांसह त्यांनी काम केले. दुपारी जेवण करण्यासाठी शेतात पाणी नव्हते. यामुळे तिघेही पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या तळ्याकडे गेले. तेथील गाळ काढल्यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यात भरपूर पाणी साठलेले आहे. सुरुवातीला नितीन खड्ड्यामध्ये उतरला. मात्र, घागर बाहेर काढताना अचानक त्याचा तोल गेला. तो पाण्यात पडल्यामुळे गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या दीपालीच्या लक्षात आला. दीपालीला चांगले पोहता येत होते. क्षणाचाही विचार करता तिने आपल्या भावाला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, भीतीमुळे नितीनने तिला गच्च मिठी मारली, यामुळे तिला पोहता येऊनही काहीच करता येत नव्हते. दोघेही बुडत असल्याचे पाहून चेतन खड्ड्याजवळ गेला. मात्र, परिस्थिती लक्षात आल्यामुळे त्याने जवळच्या लोकांना हाका मारून बोलावण्यास सुरुवात केली. दरम्यान दीपालीही हतबल झाली होती. अन्य लोक येईपर्यंत दोघेही पाण्यात गडप झाले. नंतर आलेल्या लोकांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचेही प्राण गेले होते. शोकाकुल वातावरणात रात्री ८.३० वाजता दोघांवर अंत्यसंंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेंबळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.