आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएसएनएलचे टॉवर केले सील, रेंज गायब; 769 लाखांच्या वसुलीसाठी कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मिळकत कराची थकबाकी असल्याने बीएसएनएलची मोबाइल टॉवर सील करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून सोमवारी टाॅवर सील करण्यात आले. त्यामुळे डफरीन चौक, कुमार चौक, उत्तर सदर बझार, दत्त नगर, जुना अक्कलकोट नाका परिसरातील बीएसएनएल मोबाइलचे रेंज गायब झाले. ही कारवाई मोहीम मंगळवारीही सुरू राहणार असल्याचे महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 


शहरात वेगवेगळ्या कंपन्याचे २२२ टाॅवर आहेत. त्यापैकी २२ टाॅवर बीएसएनएलचे आहेत. टाॅवर लावलेल्या जागेच्या मिळकत करापोटी ७६ लाख थकबाकी आहे. मागील दहा वर्षांपासून कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेने कंपनीस नोटीस दिली. तरीही कर भरण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेने सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली. 


कर संकलनप्रमुख आर. पी. गायकवाड, शेख यांच्या पथकांनी थकबाकी असलेले डफरीन चौक (३.२५ लाख), कुमार चौक (२.७२ लाख), उत्तर सदर बझार (२.९३ लाख), दत्त नगर (२.८२ लाख), जुना अक्कलकोट नाका (३ लाख) येथील टाॅवर सील केले. 


सर्व कंपन्यांची तपासणी
शहरातबीएसएनएल, रिलायन्ससह अन्य कंपन्यांच्या कराची तपासणी होणार आहे. इतर बहुतेक कंपन्या वेळेवर कर भरत असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. तरीही तपासणी करण्यात येणार आहे. 


कराराप्रमाणे बीएसएनएलकडून भरणा आवश्यक 
जागामालक बीएसएनएल यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे बीएसएनएलकडून मिळकत कर भरणे आवश्यक आहे, असे महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. त्यांच्यात वाद असेल तर ते त्यांनी सोडवावे, असे ते म्हणाले. टॉवर सील करताच बीएसएनएल मोबाइलचे रेंज गायब होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी उर्वरित टॉवरही सील करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल रेंज जाण्याची शक्यता आहे. याचा फटका फोन येणे, जाणे, इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे व्हाॅटसअॅप, फेसबुक, मेल आदी सेवा बंद राहणार आहे. आज पाच टाॅवर सील करण्यात आले. कर भरला नाही तर मंगळवारी अन्य १७ टाॅवर सील करण्यात येणार आहे. 


रेल्वेवर होणार कारवाई 
मोबाइलटाॅवर वसुलीनंतर महापालिका रेल्वेच्या थकबाकीकडे लक्ष केंद्रित करणार आहे. ११ काेटींची थकबाकी असून, त्यांनी रकमा भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. त्यांची माहिती रेल्वे विभागास देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त ढेंगळे-पाटील यांनी दिली. 


अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही 
बीएसएनएलच्याअधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. त्यामुळे बीएसएनएलची भूमिका समजू शकली नाही. 


सुपर टॅक्सचा प्रकार 
बीएसएनएल आणि जागा मालक यांच्यातील सुपर टॅक्स कराराप्रमाणे मिळकतकर बीएसएनएलकडून भरणे आवश्यक आहे. 

बातम्या आणखी आहेत...