आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार; विकासाला १०४, तर वेतनावर २०० कोटींची बजेट तरतूद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी साठीच्या ५० कोटींचा भांडवली खर्च वाढूनही यंदा कर-दरवाढ सूचवता मनपा अायुक्त विजय काळम-पाटील यांनी ८२८.८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. मागीलवर्षी प्रशासनाचे १०३९.५६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते, यंदा २७३ कोटी रुपये भांडवली बजेटमधून कपात केल्याचे समोर अाले अाहे. प्रस्तावित अंदाजपत्रकात मनपाचे उत्पन्न ५०१ कोटी रुपयांचे, त्यापैकी २०० कोटी (४० टक्के) इतका निधी निवृत्त कायम सेवकांच्या वेतनावर खर्च ग्राह्य धरला तर केवळ १०४ कोटी रुपये भांडवली कामासाठी मिळतील असा अंदाज वर्तवलेला अाहे.
महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सोमवारी स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांच्याकडे २०१६-१७ वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. पालिकेच्या महसुलात यंदा जेमतेम ६६ कोटी रुपये वाढतील, त्यापैकी ५० कोटी स्मार्ट सिटीच्या वाढलेल्या ५० कोटींच्या खर्चासाठी तरतूद केलेत. एलबीटी बंद असली तरी थकबाकीपोटी २५ कोटी मिळतील, मालमत्ता करात मात्र ६१ कोटींचे उत्पन्न वाढेल असा अंदाज बांधला अाहे. शासकीय अनुदानपोटी १७० कोटी उत्पन्न अपेक्षित धरले, पण एलबीटी अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.

स्मार्टसिटीसाठी ५० कोटी
स्मार्टसिटीसाठी दरवर्षी महापालिकेचा हिस्सा म्हणून ५० कोटी अपेक्षित असल्याने त्यानुसार बजेटमध्ये तरतूद केली. भांडवली कामासाठी ३८ कोटी ठेवले. त्यानुसार कामे करण्याचे नियोजन आहे.

पाच वर्षांपासून कर दरवाढ नाही
महापालिकाप्रशासन मागील पाच वर्षापासून कर दरवाढ करता खर्च ताळमेळ करीत अाहे. पुढील आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये कर दरवाढ केलेली नाही हे विशेष. पुढील वर्षात महापालिका निवडणुका पाहता सत्ताधाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे कोणतेही वाढ नको होती. निवडणूक बजेट म्हणता येईल.

ठळक वैशिष्ट्ये
- नागरिकांचे राहणीमान सुधारणे
- स्मार्ट सिटी आराखड्यातून नागरी सुविधा देणे
- मलनिस्सारण केंद्रातील पाणी एनटीपीसीला देणे
- सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर
- शासनस्तरावरील नगरोत्थान रस्ते पूर्ण करणे
- शहरातील अविकसित चौक विकसित करणे
- प्रसूतीगृहास रंगरंगोटी, तेथे सोलर सुविधा
- जन्मदाखल्यांसाठी आॅनलाइन सुविधा देणे
- ड्रेनेज लाइन घालणे
- धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण करणे

स्थायीकडे सादर
सन २०१६- १७ चे मनपा आयुक्तांचा अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांच्याकडे सादर करण्यात आले.यावेळी स्थायी सदस्य बाबा मिस्त्री, सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, चंद्रकांत रमणशेट्टी, मंदाकिनी तोडकरी, पीरअहमद शेख, रियाज हुंडेकरी, शांता दुधाळ, मुख्य लेखापाल सुकेश गोडगे आदी उपस्थित होते.

भविष्यात अडचण
मनपाचे चालू वर्षाचे उत्पन्न पाहता भविष्यात अार्थिक अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसुलीची भूमिका कठोर असणे आवश्यक आहे. प्रशासकीय खर्च कमी करण्याची सूचना बजेटमध्ये आहे.

मनपा अंदाजपत्रक मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांच्याकडे सादर केले. यावेळी सुकेश गोडगे, नगरसेवक सुरेश पाटील, पीरअहमद शेख, बाबा मिस्त्री, दिलीप कोल्हे, अनिल पल्ली, मंदाकिनी तोडकरी आदी.