आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर तहसीलवर भव्य बैलगाडी मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- शेतकऱ्यांचासातबारा कोरा करू, असे म्हणून सत्तेत आलेले भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. पंतप्रधानांनी परदेश वाऱ्या टाळल्या तरी शेतकऱ्यांचे कर्ज फिटणार आहे. परंतु, "गोरे गेले आणि काळे आले' असे सरकार चालू देणार नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला, यावेळी इंगळे बोलत होते. मोर्चामध्ये उत्तम अमृतराव, राजामामा भोसले, भाऊसाहेब मुंडे, तानाजी पाटील आदींची सरकारच्या धोरणांवर टीका करणारी भाषणे झाली. यावेळी धनंजय पेंदे, दुर्गादास भोजने, बाळसाहेब मुळे, सुरेश नेपते, महेश गोरे, संजय केवडकर, संजय भोसले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील अपसिंगा, कात्री, कामठा, मोर्डा, तडवळा, बोरी, काक्रंबा, काक्रंबावाडी, शिराढोण, टेकरी, हंगरगा (तुळ), तीर्थ(खु.), तीर्थ (बु.) आदी शहराच्या १० किमी परिसरातील गावांतून २०० बैलगाड्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतरही शेवटचे टोक उस्मानाबाद मार्गावर होते.बैलगाडी मोर्चामुळे आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय हा मार्ग जाम झाला होता. त्यातच मंगळवारचा बाजार, तहसील कार्यालय, नगरपालिका आदी कार्यालयांत जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी झाली.

चळवळीला बळकटीची गरज
शेतकरीप्रश्नाबाबत काही संघटनाच आंदोलने करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उसाचा दुसरा हप्ता बहुतांश कारखान्यांनी दिलेला नाही. यावर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

तहसीलमध्ये जनावरे बांधणार
दरम्यान,शासनाने तातडीने मागण्या मान्य केल्यास तहसील कार्यालयात जनावरे बांधणार असल्याचा इशारा रवींद्र इंगळे यांनी दिला.
या आहेत मागण्या
- संपूर्णकर्जमाफ करावे, वीजबिल माफ करा.

- दुबार पेरणीसाठी बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत.

- जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.

- एफआरपीप्रमाणे भाव देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा.

- एकरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे.

- जिल्ह्याला कृष्णा खोरेचे हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे.

- मराठवाडा उपसा सिंचन योजना पूर्ण करावी