आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० लाखांचा खर्च करूनही स्थानक गळके, साचले तळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या दोन चार दिवसांत झालेल्या पावसामुळे सोलापूर बस स्थानकाची अक्षरश: दैना उडाली आहे. स्थानकाचे नूतनीकरण आणि अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी गेल्याच वर्षी सुमारे ९० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, स्थानक आवारातील परिस्थिती पाहता हा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.
बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यांवर खड्डे पडून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आवाराला तळ्याचे रूप आले आहे. दुसरीकडे बसस्थानकाच्या मुख्य इमारतीचे वाॅटर प्रूफिंग होऊनही पाणीगळती सुरू आहे.

बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ९० लाखांचा खर्च करून वर्ष होते होते तोच बसस्थानक गळायला लागले आहे. अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. बसस्थानकाच्या इन आऊट गेटवरदेखील हीच परिस्थिती आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.
बसस्थानकाची दुरवस्था येथेच थांबत नाही तर तुळजापूर, उस्मानाबाद बार्शीला जाणाऱ्या बसस्थानकाची अवस्था याहून वाईट आहे. प्रवाशांना बसण्यासाठी चांगली जागा नाही. छत गळके आहे. शेजारीच बस स्थानकावरील सर्व कचरा एकत्र करून येथे टाकला जातो. पावसाळ्यात हा कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. याचा प्रवाशांना मोठा त्रास होतो.
परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गावातल्या बसस्थानकाची एक प्रकारे दैना उडाली आहे. तरीही एसटी प्रशासनाला याची फिकीर नाही. वर्षानुवर्षे बस स्थानकावर हीच स्थिती आहे.


^बस स्थानकावरपाणी साचणे ही बाब चिंताजनक आहे. यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. मात्र वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यावर खड्डे पडले असतील. पुढच्या वेळी क्राँक्रिट पद्धतीनेच रस्ता केला जाईल. श्रीनिवास जोशी , विभाग नियंत्रक, सोलापूर

^सोलापूर बसस्थानकाच्या गळक्या इमारतीची रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची चौकशी केली जाईल. उद्या याविषयी विभाग नियंत्रकांशी चर्चा केली जाईल. विजय देशमुख, परिवहन राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...