आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरकासूर प्लास्टिक विरोधात पालिकेची आजपासून मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील ड्रेनेज लाइन प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरण आणि सांडपाणी निचऱ्यावर होत आहे. ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या विरोधात बुधवारपासून शहरात मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ५० मायक्राॅनपेक्षा जास्त जाडीचे कॅरिबॅग विकणाऱ्या दुकानदारांनी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यासाठी विना परतावा दरवर्षी ४५ हजार रुपये भरणे आवश्यक असताना बहुतेक व्यापाऱ्यांनी भरले नाहीत. त्याबाबत मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

दिवाळी उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. प्लास्टिक पिशव्या प्राणी खातात. ते पोटात गेल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण होतो. कचरासंकलन केल्यानंतर भोगाव येथील वीज निर्मिती केेंद्रात परिणाम दिसून येतो. शहरात ड्रेनेज लाइन कॅरिबॅगमुळे तुंबतात. दिवाळीत कॅरिबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात असल्याने या दरम्यान कचऱ्यावर परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबींची माहिती शून्य कचरा मोहिमेत समोर आल्याने महापालिकेने कॅरिबॅगच्या विरोधात मोहीम राबवण्याचे निश्चित केले. बुधवारपासून ही मोहीम सुरू करण्यात येईल. त्यासाठी महापालिकेने पथक तयार केले आहे. 

जमाझालेली रक्कम जनजागृतीसाठी
एका व्यापाऱ्यास ४५ हजार रुपयांप्रमाणे मनपाकडे जमा झालेली एकूण रक्कम मनपास कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही. कॅरिबॅग विरोधात जनजागृती करण्यासाठी ती रक्कम वापरावी, असा नियम आहे. त्यामुळे यापुढील काळात येणारी रक्कम त्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

दर दीड - दोन महिन्याला प्राण्यांवर शस्त्रक्रिया 
प्लास्टिकखाल्याने गंभीर समस्या निर्माण झालेल्या मोकाट जनावरांवर स्थानिक पशुवैद्यकीय संस्थांनी तातडीने उपचार केल्याने काहींचा जीव वाचला. सहा महिन्यांपूवी पीपल फॉर अॅनिमल संस्थेने एका गायीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तीन किलोपेक्षा जास्त प्लास्टिक काढले. जिल्हा पशुचिकित्सालयात दीड ते दोन महिन्याला प्राण्यांवर शस्त्रक्रिया करून प्लॅस्टिक काढण्यात येते.
 
प्राण्यांना घातक 
जमिनीवरील समुद्रातील प्राणी खाद्य म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांकडे आकर्षित होतात. त्यांच्या पोटात पिशवी गेल्यावर त्यांना जंतुसंसर्ग होऊन त्यांची चयापचय प्रक्रिया बिघडून त्याची परिणती अखेर मृत्यूत होते. आज जगातील समुद्रांमधील ९० टक्के कचरा हा प्लास्टिक पिशव्या इतर प्लास्टिकचा आहे. तीच गत जमिनीवरील कचऱ्याचीही आहे. तुम्ही आजूबाजूच्या कचऱ्याच्या ढिगाकडे नजर टाकली तर तुम्हाला प्लास्टिकची पिशवी चघळणारी एखादी गाय वा कुत्रा नक्कीच दिसेल. 

५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवर कारवाई 
महापालिकेने सुरू केलेेल्या मोहिमेत ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार आहे. जाडी मोजण्यासाठी महापालिकेकडे उपकरण असून, त्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. 

पालिकेकडे नोंदणी करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक 
५० मायक्राॅनपेक्षा जास्त जाडीच्या कॅरिबॅग विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी करणे सन २०१६ च्या कायद्यानुसार आवश्यक आहे. पालिकेकडे एकही व्यापाऱ्यांनी नांेदणी केली नाही. नांेदणी करताना ४५ हजार रुपये विनापरतावा भरणे आवश्यक आहे. ही रक्कम दरवर्षी भरावी लागणार आहे. 

... तर करण्यात येईल गुन्हा नोंद 
५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीचे कॅरिबॅग शहरात वापरता येणार नाही. वापरले तर तो गुन्हा आहे. या प्रकरणी कॅरिबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारपासून मोहीम घेण्यात येणार आहे. ५० मायक्राॅनपेक्षा जास्त जाडीचे कॅरिबॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मनपाकडे दरवर्षी ४५ हजार रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त मनपा
 
प्लास्टिक पिशव्यांवरबंदीची सुरवात स्वत:पासून आवश्यक आहे. प्रशासनाने जनजागृती करण्याबरोबर कठोर दंडात्मक कारवाई करावी. मोठ्या व्यापारी संघटना आता प्लास्टिकबाबत सतर्क झाल्या आहेत. रस्त्यावरील विक्रेते, मंडईमध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचा वाढता वापर सर्वांसाठी घातक आहे.
- नाना चव्हाण, पर्यावरणप्रेमी 
 
बातम्या आणखी आहेत...