आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हानांचा सामना करण्याची सोलापूर विद्यापीठात क्षमता, डाॅ. पाटील यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जळगाव विद्यापीठ असो वा सोलापूर विद्यापीठ, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता या विद्यापीठांकडे आहे. महाराष्ट्रातील इतर अनेक विद्यापीठांना जे चांगले नवे बदल घडवता आले नाहीत ते बदल सोलापूर विद्यापीठाने सिद्ध करून दाखवले. विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आघाडी घेतली आहे, असे मत जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. पी. पी. पाटील यांनी केले. 

सोलापूर विद्यापीठाच्या १३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. एन. मालदार होते. कार्यक्रमास डॉ. प्रकाश वडगावकर, प्रभारी कुलसचिव प्रा. पी. प्रभाकर, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील, वित्त लेखा अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे, बीसीयूडी प्रभारी कार्यभार प्रा. व्ही. बी. पाटील उपस्थित होते. सकाळी विद्यापीठात ध्वजवंदन झाले. यानंतर मुख्य सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण झाले. 

कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील म्हणाले, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे दोन जिल्ह्यांसाठीच स्थापन झाले होते. तर सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी स्थापन झाले. तेव्हा ही विद्यापीठे यशस्वी होऊ शकतील का? अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र या दोन्ही विद्यापीठांनी गुणवत्तेच्या बळावर चांगली कामगिरी करून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. यानिमित्त अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. एन. एन. मालदार म्हणाले, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. हे बदल स्वीकारण्यासाठी विद्यापीठांनी तत्पर राहिले पाहिजे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विद्यापीठात मोठे बदल होणार आहेत. प्रत्येकाने विद्यापीठासाठी आपण काय करू शकतो, हा विचार करून समर्पित भावनेने काम करावे, म्हणजे विद्यापीठाची सातत्याने प्रगती होत राहील. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयार केलेल्या ई-सुविधा मोबाइल ॲपचे उद््घाटन प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील प्राचार्य महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य आबासाहेब देशमुख यांचा सत्कार झाला. प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा. पी. प्रभाकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर कोळेकर तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन वित्त लेखा अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे यांनी केले. 

जीवनगौरव पुरस्कारप्राप्त झालेले थोर शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश वडगावकर म्हणाले, विद्यापीठाने दिलेला जीवन गौरव पुरस्कार मला घडवण्यात योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान आहे. मला विद्यापीठाने पुरस्कार म्हणून दिलेली रक्कम मी विद्यापीठास आणखी भर घालून देत असून, त्या रकमेतून रसायनशास्त्रात सोलापूर विद्यापीठातून एम. एस्सी. पॉलिमरला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्ण पदक द्यावे. 

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
- डॉ. ए. एच. माणिकशेटे, वालचंद महाविद्यालय, सोलापूर
- डॉ. बी. एम. भांजे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप 

विद्यापीठ गुणवंत शिक्षक
प्रा. डॉ. पी. प्रभाकर, संचालक, भूशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ 
 
पुरस्कार वितरण 
- उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, दयानंद महाविद्यालय, सोलापूर 
- स्वेरीज इंजिनिअरिंग, गोपाळपूर 

उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक
- प्रा. डॉ.जी. एस. शहाणे , दयानंद महाविद्यालय, सोलापूर
- प्रा.डॉ. आर. आर. कोठावळे, शिवाजी महाविद्यालय, बार्शी 

गुणवंत कर्मचारी
- विद्यापीठ गुणवंत कर्मचारी राजेश भोरकडे, सोलापूर विद्यापीठ
- गुणवंत कर्मचारी :श्री. सूर्यकांत पारखे, उमा महाविद्यालय, पंढरपूर 
बातम्या आणखी आहेत...