सोलापूर - तब्बल दीड लाख रुपये किमतीच्या म्हशी अन्् सव्वालाख रुपयांच्या बैलजोड्या सिद्धेश्वर यात्रेतील जनावरांच्या बाजारात आल्या आहेत. म्हशींबरोबरच देशी (जवारी) गाय, बैलांना जास्त मागणी आहे. विजापूर रस्ता परिसरातील रेवणसिद्धेश्वर मंदिराजील मोकळ्या जागेत बाजार भरला आहे.
यंदा उशिरा परवानगी मिळाल्याने धावपळ करीत बाजार भरवण्यात आला. शनिवारपर्यंत लहान-मोठे एकूण साडेतीन हजार जनावरे विक्रीसाठी आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
बैलबाजारात देवस्थान यात्रा समितीतर्फे जनावरांना पिण्यासाठी सहा ठिकाणी पाण्याचे नळ, सर्वत्र लाइट व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांमध्ये तीन भाकरी भाजी अशी जेवणाची व्यवस्था देवस्थान समितीतर्फे करण्यात आली आहे. जनावरांच्या खरेदी व्यवहारानंतर देवस्थान समितीतर्फे खरेदीच्या पावतीवर दोन टक्के शुल्क घेण्यात येते, अशी माहिती जनावर बाजार समितीचे व्यवस्थापक बसवराज खदनाळे यांनी सांगितले.
जनावरे उतरवण्यसाठी रॅम्पची गरज
बाजारात विक्रीसाठी आणलेली खरेदीनंतर जनावरं वाहनांमधून उतरवण्यासाठी एक रॅम्प आहे. पण, बहुतांश पशुपालक त्या वापराकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनातून जनावरे उतरवताना त्यास गंभीर इजा होण्याचा धोका आहे. जनावर बाजारात जनावरे उतरवण्यासाठी रॅम्पची संख्या वाढवण्याची गरज अाहे.
‘अॅनिमलराहत’चे प्रदर्शन
अॅनिमलराहत संस्थेतर्फे जनावरांना मोफत उपचार करण्यात येत आहेत. तसेच, जनावरांवर करण्यात येणाऱ्या अमानुष अत्याचार, अंधश्रद्धेतून होणारे गावठी उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यास शेतकरी पशुपालकांची चांगली गर्दी आहे. डॉ. सत्यजित पाटील, डॉ. वर्षा पांचाळ, विनायक बचुटे, अमित मोटे, भीमाशंकर विजापुरे हे पशुपालकांना मार्गदर्शन करीत आहेत.
साहित्य विक्रेत्यांनी फुलले बाजार
दोरखंड,घुंगरपट्टा, घंटा, चंगाळ्या, म्होरक्या, वैरण यासह वै शेतकऱ्यांच्या रोजच्या वापरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ फुलली आहे.
रोज १६ लिटर दूध देणारी ‘जाफराबादी’
म्हशींची संख्या जास्त आहे. गुजरात, हैदराबाद येथून काही व्यापाऱ्यांनी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. जाफराबादी, मुऱ्हा जातीच्या या म्हशीच्या किमती ८० हजारांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत आहेत. रोज १६ लिटर दूध देणाऱ्या एका जाफराबादी म्हशींची किंमत एक लाख ३० हजार रुपये असल्याचे, विक्रेते चाँद शेख यांनी सांगितले. तसेच, पंढरपुरी जातीच्या म्हशी विक्रीसाठी आल्या असून, ३० हजार रुपयांपासून त्यांच्या किमती आहेत.
सिध्देश्वर यात्रेनिमित्त विजापूर रस्ता परिसरात रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ जनावरांचा बाजार भरला आहे. अनेक दुभती जनावरे आणि बैलजोड्या आल्या आहेत.
सव्वा लाखांना खिलार बैलजोडी
विक्रीसाठी यंदाच्यावर्षी बैलजोड्यांचे प्रमाण कमी आहे. कामाला जुंपण्यासाठी तयार बैल खोंडापेक्षाही छोट्या वासरांची संख्या जास्त आहे. खिलार बैलजोड्यांना मागणी भरपूर असून, त्यांच्या किमती सव्वा ते दीड लाखांपर्यंत आहेत. काही पशुपालक नवीन बैलजोड्या खरेदीसाठी पाहणी करीत होते. तर, काहीजण स्वत:कडे असलेल्या एका बैलासाठी चांगला जोडीदार बैल घेण्यासाठी त्यांची शोधमोहीम सुुरू आहे. नजरेत भरलेल्या बैलाच्या नख्या, दात पाहणे, त्यांच्या किमतीची चाचपणी करीत असल्याचे चित्र बैलबाजारात होते.
दुधासाठी गाय घेणार
^गेल्या दोन वर्षांत दुष्काळामुळे बैलबारदाना कमी केला होता. पण, यंदाच्यावर्षी चारा पाणी मुबलक आहे. बैलासाठी नवीन जोडीचा बैल दुधासाठी एक गाय खरेदी करणार आहे.” बसवराजबर्हिजे, शेतकरी, दिंडूर, ता. दक्षिण सोलापूर