आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Center, State Government Is Not Worried About Farmers Narayan Rane

केंद्र, राज्यामधील सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही - नारायण राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर; राज्यात २२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. परंतु केंद्र राज्यातील भाजप सरकारला याचे काहीही देणे-घेणे नाही. या शेतकरीविरोधी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे.
शेतकऱ्यांना मदत केवळ नाटक सुरू आहे. दीड वर्षात २१० दिवस परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणण्यात अपयशी ठरले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलका पोपट असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.
तसेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या छताखाली एकत्र येऊन आक्रमकपणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले. मंगळवारी (दि. १७) बळीराजा संघटनेने येथील तनपुरे महाराज मठात आयोजिलेल्या ऊस दूध परिषदेत ते बोलत होते.
राणे म्हणाले, यंदा राज्यात दुष्काळ असतानाही सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. धान्याला हमीभाव नाही. खरीप, रब्बी हंगाम हातचा गेला. मात्र, सरकारने काही जिल्ह्यापुरती दुष्काळाची घोषणा केली. पैसेवारीच्या घोळात राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाला नाही. शेतकऱ्यांना मदतीची राज्य सरकारची मानसिकता नाही. आघाडी सरकारने शेतीकर्ज, वीजबिले माफ केली. मग फडणवीस सरकार कर्जमाफी, वीजबिलमाफी का देऊ शकत नाही?

प्रास्ताविक बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर यांनी केले. या वेळी नितीन बागल, प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल, संघटनेचे मार्गदर्शक बी. जी. पाटील, प्रवक्ते संजय पाटील- घाटणेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन बागल, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सत्ता आणि टक्केवारीसाठी शिवसेना लाचार
शिवसेनाम्हणजे लाचार. सेनेतील लोक सत्तेसाठी, टक्केवारीसाठी लाचार होतात. पंधरा दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या फडणवीसांनी वर्षभरात काय केले. महाभारतातही घडलेले कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत भाजप-सेनेेेत घडले. जलयुक्त शिवार ही नाव बदललेली जुनी योजना असल्याचेही राणे यांनी म्हटले.

जिल्हाधिकाऱ्यांची दादागिरी चालणार नाही
सोलापूरचेजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविषयी राणे म्हणाले, आपण जिल्हाधिकारी आहात. जिल्ह्यातील जनतेचे नोकर आहात, साहेब नव्हे. जनहिताची कामे करा. आपल्याला दादागिरी करायला पाठवले नाही. मुख्यमंत्री फडणवीसही आपल्याला कायद्याने वाचवू शकणार नाहीत. राज्यात सत्ता कोणाचीही असू द्या, आपली दादागिरी चालणार नाही.

सोलापूर, पुण्याला वेगवेगळा न्याय
भारतीयांच्यापैशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या देशांना बोटीने पाणी पुरवतात. मात्र राज्य सरकार धरणांमधील पाणीही शेतकऱ्यांना देत नाही, हे दुर्दैव आहे. हे सरकार पाणीप्रश्नी सोलापूर पुणे जिल्ह्याला वेगवेगळा न्याय देत असल्याची टीकाही राणे यांनी केली.

परिषदेत संमत झालेले ठराव
सोलापूरजिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी. साखरेचे वायदेबाजार बंद करा, उजनीतून डाव्या, उजव्या कालव्यात, भीमा, सीना नदीतून पाणी सोडा, दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ, दूध पावडर निर्यातीला अनुदान द्या, प्रत्येक जनावराला १०० रुपये अनुदान द्या, जळालेल्या पिकांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या, राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज, वीजबिल माफ करा, मराठा, धनगर, मुस्लिम कोळी समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई करा.