आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिझेरिअन’ प्रॅक्टिस होत आहे आता ‘नॉर्मल’, आधुनिक जीवनशैलीसह तंत्रज्ञानाचे परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रसूतसमयी संभाव्य स्थिती पाहून ऐनवेळी डॉक्टरांकडून ‘सीझर’ करण्याचा सल्ला दिला जातो. तो टाळण्याचे धाडस अवैद्यकीय क्षेत्रातील कुणी उच्चशिक्षित नातेवाइकही करू शकत नाहीत. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे करिअर किंवा उशिरा लग्न झालेल्या महिलांना प्रसूतीचा योग्य कालावधी निघून गेल्याने प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढते. गरोदर काळात आहार, विहार, तपासण्या किंवा औषधांकडे दुर्लक्ष केले तर प्रसूतीदरम्यान बाळ आणि महिलेच्या जीवाच्या सुरक्षितेसाठी ‘सीझर’ आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी सीझर आधुनिक पर्याय आहे. ज्यात गरोदर मातेच्या पोटावर शस्त्रक्रिया करून कृत्रिम प्रसूती केली जाते. प्रसूतीच्या त्या नाजुक क्षणी डॉक्टरांचा सल्ला ऐकणे नातेवाइकांना भाग पडते. अशा वेळी नॉर्मल प्रसूतीचा आग्रह लांबच, तर पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवणेही केवळ अशक्य असते.

जसे सगळेच डाॅक्टर अकारण सीझर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात असे म्हणता येणार नाही, तसे प्रसूतीच्या त्या नाजूक क्षणी नातेवाइकांच्या वैद्यकीय अज्ञानाचा गैरफायदा स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी कुठलेच डॉक्टर घेत नाहीत, असे म्हणणे धाडसाचे खूपच ठरेल. नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत सीझर प्रसूतीचे हॉस्पिटल बिल हे दहा पटीने अधिक असते. मग जिथे अवैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षितालाही सीझरचा डॉक्टरी सल्ला ऐकणे भाग पडते, तिथे सामान्य अशिक्षित किंवा गोरगरीब महिलेच्या नातेवाइकांची अवस्था काय होते, हे सांगणे लगे. त्यात पुन्हा बहुतांश हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रसूतीपूर्वीच अनामत बिल जमा करण्याची सक्ती ही प्रसूतीस आलेल्या मातेच्या नातेवाइकांसाठी अलीकडे धास्तीची ठरते आहे.
डॉ.ओमप्रकाश दोडमनी, प्रसूतितज्ज्ञ
बाळ तीन किलोंपेक्षा जास्त वजनाचे असेल तर सीझरचा विचार करावा लागतो. मातेच्या मुत्राशयाला गुदद्वाराला धोका होऊ शकतो. उशीर होत असेल तर बाळाच्या मेंदूला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह, रक्तदाब, थायरॉइडसारख्या व्याधी असलेल्या मातांची वेळोवेळी प्रसूतीपूर्व धोका टाळण्यासाठी तपासण्या महत्त्वाच्या असतात.”
७५% नॉर्मल, २५ % सीझर

डॉ.अजित गांधी, प्रसूतितज्ज्ञ
गरोदर आई-बाळाच्या जीवाला धोका असेल तर सीझरचा पर्याय प्रसूतीसाठी उचित ठरतो. साधारणपणे २५ टक्के प्रसूतीदरम्यान सीझर अनिवार्य ठरते. उर्वरित ७५ टक्के महिलांची प्रकृती नैसर्गिक नॉर्मल प्रसूती होण्यायोग्य असते. आई-बाळ यांच्या जीवास धोका असेल तर सीझर करावे लागते. गर्भात बाळास सौच झाल्यानंतर ते तोंडात गेल्यास गुदमरण्याची भीती असते. आईच्या प्रकृती प्रॉब्लेममुळेही धोका असतो.”

धोक्याच्यावेळीच सीझरचा पर्याय
डॉ.मंजिरी चितळे, प्रसूतितज्ज्ञ
नैसर्गिक प्रसूती होणे केव्हाही चांगले. बाळ आणि गरोदर मातेच्या आरोग्याबाबत एेनवेळी काही धोका निर्माण झाल्यास सीझरचा पर्याय योग्य ठरतो. गरोदर मातेच्या कमरेची हाडे खूप छोटी असल्यास, रक्तदाब असेल, खूपच रक्तस्राव होत असेल, बाळाच्या वाटेत वार येत असेल किंवा बाळ खूपच मोठे असेल तर प्रसूतीवेळी मातेस-बाळास धोक्याची शक्यता असते. मग अशा वेळी सीझर दोघांसाठी योग्य ठरते.”

मातांकडूनचहोते सीझरची मागणी
डॉ.डी. व्ही. कुर्डूकर, प्रमुख,स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र विभाग, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय
सीझरसाठी गर्भवतींकडूनच मागणी वाढली आहे. महिलांमध्ये प्रसूतकळा सहन करण्याची इच्छा कमी होत चालली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्येही ३० ते ३५ टक्के सीझरचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयांतही बाळ बाळंतीण सुखरूप राहण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागही अत्याधुनिक झाल्याने सीझरची जोखीम डॉक्टर पत्करतात. जगात सर्वाधिक सीझरचे ८० टक्के प्रमाण ब्राझीलमध्ये आहे.”
वाट पाहण्याची कला
प्रसूतिशास्त्रात‘वाट पाहणे’ ही सुंदर कला मानली जाते. इंग्रजीत तिला Masterly Inactivity म्हटले जाते. सर्वतोपरी काळजी घेऊन प्रसूतीच्या प्रवासाची कामे निसर्गाला करू देण्यासाठी शांतपणे वाट पाहण्याची कला प्रसूतिशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना मानली जाते. ही कला आत्मसात करणे सोपे नसले तरी अवघडही नाही. ज्यामुळे नैसर्गिक प्रसूतीचा आनंद प्रसूत मातेसह डॉक्टरांना नातेवाइकांनाही घेता येईल.
प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर सिझर शस्त्रक्रियेचा झपाटा गेल्या दशकापासून वाढला. गरोदरपण आणि प्रसूती हे काही आजार नव्हेत, तर त्या गरोदर मातेच्या आयुष्यातील नैसर्गिक घटना आहेत. शुक्राणू-स्त्रीबीज संयोगातून साधारण अडीच-तीन किलोच्या हाडामासांच्या नव्या जीवाला जन्म देण्याची प्रक्रिया आणि त्या बाळाचा योनी मार्गातून बाहेर पडण्याचा पहिला प्रवास, या दोन्ही गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या असल्या तरी निसर्गदत्त आहेत.
सीझरसाठी पुढे येणारी कारणे
१. बाळाचे अनियमित ठोके वाढत जाणे
२. बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे पडणे
३. गर्भाशयात पाण्याचे प्रमाण कमी होणे
४. बाळाने पोटात सौच केल्याने प्रादुर्भाव
साधारणपणे पंचाहत्तर टक्के नैसर्गिक तर पंचवीस टक्के सीझरयोग्य गरोदर महिला
ओव्होरऑलप्रसूतीसाठी दाखल गरोदर महिलांपैकी ७५ टक्के महिलांची प्रसूती नैसर्गिक होण्यायोग्य असते. उर्वरित केवळ पंचवीस टक्के स्त्रियांची प्रसूती विविध कारणांनी गुंतागुतीची असल्यामुळे सीझर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. आजघडीला प्रत्यक्षातील चित्र उलटे दिसते. शहरी-ग्रामीण भागात ‘सीझर’ शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम प्रसूती घडवून आणण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. आगामी काही वर्षांंनंतर ‘नैसर्गिक प्रसूती’ हा माध्यमांच्या बातमीचा विषय होऊ शकतो की काय, अशी स्थिती सध्याच्या अवास्तव ‘सीझर प्रॅक्टिस’चे प्रमाण पाहिल्यानंतर लक्षात येते. सर्रास सीझर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचा सल्ला बहुतांश डॉक्टर देतात, जो प्रसूत महिलेच्या नातेवाइकांना ऐकण्याशिवाय पर्याय नसतो.

याकारणांसाठी खासगी हाॅस्पिटलमध्ये सीझर करण्याची वाढलीय मानसिकता
नैसर्गिकप्रसूतीसाठी गरोदर माता आणि डॉक्टर दोघांनाही वाट पाहवी लागते. गरोदर मातेला प्रसूतकळा सोसाव्या लागतात. प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांना लक्ष ठेवून निरीक्षणे नोंदवावी लागतात. याऊपरही बाळ-बाळंतीण मातेच्या जीवाला दुर्दैवाने धोका झालाच, तर मात्र संबंधित डॉक्टरवर फौजदारी, न्यायालयीन खटला, हॉस्पिटलवर हल्ला, डॉक्टरला मारहाण आणि त्यातून बदनामी अशा अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. एकीकडे या सगळ्या कटकटीतून सुटका आणि ‘नॉर्मल’च्या तुलनेत ‘सीझर’च्या प्रसूतीमागे मिळणारे दहापट अधिक बिल अशा दोन्ही बाबी डॉक्टरांना सुरक्षित वाटताहेत. ‘नॉर्मल’ प्रसूतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टरही समाजामध्ये आहेत, पण अपवादाने!
कारणांविषयी दोन्ही बाजूने असे मतप्रवाह
कारणांच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारचे मत प्रवाह स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरांमध्ये आहेत. नैसर्गिक प्रसूतीसाठी आग्रही असलेले डॉक्टर सीझरसाठी वरील कारणांकडे पाहता ती नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मानतात. त्यामुळे कारणांच्या बाबतीत सर्व डॉक्टरांमध्ये एकमत दिसत नाही.
बदलत चाललेली आधुनिक जीवनशैली आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अलीकडे ग्रामीण भागापासून ते शहरी महानगरापर्यंत ‘सिझेरिअन किंवा सीझर’ हा कृत्रिम प्रसूतीचा शब्द परवलीचा झाला आहे. प्रसूतीनंतर नातेवाइकांकडून पहिला प्रश्न विचारला जातो, ‘सीझर की नॉर्मल? बहुतांश प्रश्नकर्त्यांना ‘सीझर’ झाल्याचे उत्तर मिळते!, इतके ‘सीझर’चे प्रमाण हे ‘नॉर्मल’ झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...