आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढ्यातील तलावात चालुक्यकालीन मंदिराची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - येथील कृष्ण तलावातील गाळ काढताना बाराव्या शतकातील चालुक्योत्तर काळातील चार मूर्ती असलेल्या शिवलिंगासह अनेक मूर्ती सापडल्या होत्या. मंगळवारी दुपारी १२ वाजता सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डाॅ. माया पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी त्यांची पाहणी केली. तलावातील अवशेषावरून तेथे मंदिर असल्याची शक्यता डाॅ. पाटील यांनी व्यक्त केली. तसेच जूनमध्ये पुरातत्त्व विभागातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्खनन करणार असल्याचे सांगितले.

लोकसहभागातून कृष्ण तलावातील गाळ काढण्यात येत आहे. दोन दिवसांत खोदाई करताना जवळपास सात ते आठ मूर्ती सापडल्या आहेत. विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागप्रमुख डाॅ. पाटील यांनी तलावाला भेट दिली. येथे चालुक्योत्तर ब्रह्मा, विष्णू, महेश यांची मंदिरे असू शकतात. बाराव्या शतकात ही महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी होती. दगडावर कमळ, कणी तसेच बांधकामाच्या जोत्यावर नक्षीकाम असल्याचे सूक्ष्म पाहणीत दिसते. सापडलेल्या शिवलिंगावर चार देवाच्या मूर्ती आहेत. या शिवलिंगाला सर्वतोभद्र शिवलिंग म्हणतात. तत्पुरूष, वामदेव, अघोर, सदोजात अशी शंकराची चार रूपे आहेत. अशी मूर्ती दुर्मिळ असल्याचे डाॅ. पाटील म्हणाल्या. तसेच दुसऱ्या लिंगावर पार्वतीरूपी लिंगपंचक आहे. त्यामध्ये शिव पार्वती यांचे एकत्रित रूप असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी गाळ काढताना सापडलेल्या मूर्तींमध्ये भगवान महावीर, दुर्गारूपी मूर्ती सापडल्या आहेत. त्या सर्व पालिकेत ठेवल्या आहेत.

यावेळी सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाचे डाॅ. प्रभाकर कोळेकर, ज्ञानेश्वरी हजारे, डाॅ. आर. आर. पाटील, महेश दसवंत, अॅड. नंदकुमार पवार, विजय बुरबुल, सोमनाथ माळी, युवराज शिंदे, विशल दंडवते, संतोष गोवे उपस्थित होते.
या परिसरात बाराव्या शतकातील मंदिरे असावीत. येथे महात्मा बसवेश्वरांचे वास्तव्य होते. त्यामुळे शिवमंदिरे असण्याची शक्यता आहे. पुढील पिढीसाठी ऐतिहासिक मंदिरे जपून ठेवली पाहिजेत. परिसरातील नागरिकांनी मंदिराची सुरक्षितता जपावी.” डाॅ. माया पाटील, पुरातत्त्व विभाग प्रमुख, सोलापूर विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...