आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेतस्नानाने आरोग्य धोक्यात, त्याच पाण्यात भाविकांचे स्नान, पवित्र तीर्थ म्हणूनही प्राशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - ‘एेसीचंद्रभागा, एेसा भीमातीर’ असे अभंगातून वर्णन असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस भयावह होत आहे. नदी पात्रातील जुन्या नवीन बंधाऱ्यामुळे सध्या पात्रात पाणी साठवले आहे. या पाण्यातच शहरातील ड्रेनेजचे मिसळणारे पाणी, मृतदेहाला स्नान घालणे, जनावरे धुणे असे सर्रास प्रकार सुरू आहेत. परिणामी भाविकांना चंद्रभागा स्नानाचा पवित्र आनंद याच पाण्यात पाण्यात घ्यावा लागतो. या दूषित पाण्यामुळे वेगवेगळ्या साथीच्या रोगाचे आजार भाविकांना केव्हाही उद्भवू शकतात.

चंद्रभागा नदीचे प्रदूषण स्वच्छतेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांची मोठ्या यात्रांपुरतीच जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाते. इतर वेळी काय असा प्रश्न पडतो. राज्यातून आलेले भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी चंद्रभागा स्नानाला महत्त्व देतात. चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर भाविक या नदीचे जल तीर्थ म्हणून प्राशन करतो. गंगेसमान असलेल्या चंद्रभागेचे तीर्थ अनेक भाविक घरी घेऊन जात असतात. अशा या चंद्रभागेची अवस्था दिवसेंदिवस बकाल होऊ लागली आहे. निर्माल्य टाकणे, कपडे धुणे, चिंध्या, प्लॅस्टिकचे द्रोण, पत्रावळी, नारळाचे केसर, फुलांचे सुकलेले हार, दुभंगलेल्या मूर्तींचे ढिगारे यामुळे प्रदूषण वाढतच चालले आहे.
चंद्रभागा नदीच्या स्वच्छता, प्रदूषण तसेच पावित्र्य राखण्याबद्दल प्रत्येक घाटावरील फलकावर नुसत्या सूचना लिहून प्रशासनाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. याबाबत येत्या काळात कठोर पावले उचलण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडली गेली पाहिजे, अशी मागणी नागरिक आणि परगावच्या भाविकांकडून केली जात आहे.

^चंद्रभागा नदीच्या उगमापासून होत असलेले प्रदूषण तसेच स्वच्छतेसंदर्भात मध्यंतरी सुमारे एक महिनाभर मालिका लावून शासनाचे, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’तून करण्यात आलेला होता. तरीदेखील शासन स्तरावर अद्यापही चंद्रभागा स्वच्छतेसंदर्भात कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून अजून हा विषय गांभिर्याने घेतला जात नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.” ज्ञानेश्वर जोगदंड, महाराज

^साठविलेल्या पाण्यात मृतदेह बुडवणे, जनावरे धुणे, ड्रेनेजचे पाणी मिसळणे आदी गोष्टींमुळे या पाण्यातच स्नान करणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या साथीच्या नागरिकांना आजाराचा गंभीर धोका पोचू शकतो.” डॉ.वर्षा काणे, सर्जन, पंढरपूर

^प्रशासनाकडून चंद्रभागेचे पावित्र्य राखण्याचे सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यात्रांच्या काळातच नाही तर इतर वेळीही उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जात आहे. प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला जात आहे.” संजयतेली, प्रांताधिकारी, पंढरपूर

^चंद्रभागेच्या प्रत्येक घाटावर सूचनांचे फलक दिसत आहेत. नुसत्या फलकांमुळे स्वच्छता राखली जाणार नाही. जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष असल्याचे एेकले आहे. त्यांनी कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे. तरच प्रदूषण, स्वच्छता पावित्र्य अबाधित राहील. शिवाय आरोग्याचा प्रश्नही राहणार नाही.” विष्णुपंत देशमुख, भाविक, मराठवाडा