आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता धर्मादाय रुग्णालयांची तपासणी स्वयंसेवी संस्थांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांकडून मोफत सवलतीच्या दरात उपचार देण्यासंबंधी झालेल्या बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सर्वच अधिकारी यांची झाडाझडती घेतली. धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्वयंसेवी संस्था नियुक्त करण्याचे आदेश देत प्रत्येक रुग्णालयात एक स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात धर्मादाय रुग्णालयामध्ये २० टक्के खाटा राखीव ठेवण्याबाबतच्या समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी रणजितकुमार, सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती कोरे, जिल्हा शल्यचिकित्सक पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी संभाजी भडकुंबे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके, सरकारी वकील संतोष न्हावकर, विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर, तहसीलदार उज्ज्वला सोरटे आदी उपस्थित होते.

विक्रीकर विभाग वगळता इतर एकाही विभागाने अहवाल दिला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या अहवालामध्ये बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल, जगदाळेमामा हॉस्पिटल, कुर्डुवाडी येथील विनायक वाघळे ट्रस्ट, पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटल, अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँक तर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलने विक्रीकर भरण्यासाठी नोंदणी केली नसल्याचे नमूद आहे.

याविभागाने दिला नाही अहवाल : जानेवारी२०१६ मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल द्यायचा. यावर त्यांनी कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना होत्या. अहवालाबाबत महिनाभरात उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी शहरातील धर्मादाय रुग्णालयांकडून शासन नियमाप्रमाणे खाटा राखीव ठेवल्या जात असल्याचे सांगितले. आज यशोधरा हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल असल्याचे सांगताच सहकारमंत्री देशमुख संतापले. ‘शहरातील रुग्णालयांची तपासणी केली का? त्याचा अहवाल कोठे आहे? मी छातीठोकपणे सांगतो, यशोधरामध्ये जे रुग्ण दाखल आहेत, ते त्यांच्याच जवळचे आहेत. यामध्ये एकाही सर्वसामान्य रुग्णाला लाभ मिळत नाही,’ असे देशमुख सांगताच आडकी यांना पुढे उत्तरच देता आले नाही.

पाठपुरावा आमदार गैरहजर
धर्मादायरुग्णालयातील निर्धन गरजू रुग्णांना मोफत सवलतीच्या दरात उपचार मिळण्यासाठी आयोजित बैठकीस सदस्य असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. दुसरे सदस्य आमदार प्रशांत परिचारक गैरहजर होते. विशेष सदस्य असलेल्या विभागांच्या विभागप्रमुखांऐवजी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावरून संबंधित अधिकाऱ्यांना असलेल्या विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

रुग्णांना लाभ मिळत नाही, माझाही अनुभव
^शासन आदेशानुसार अनेक धर्मादाय हॉस्पिटलमध्ये रुग्णांना लाभ मिळत नाही, हा माझा अनुभव आहे. जे रुग्णालय लाभ देत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई अपेक्षित आहे. तपासणी करणे, त्याचा अहवाल घेणे आणि कठोर कारवाई करणे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. पुढील बैठकीत रुग्णालय तपासणीसाठी स्वयंसेवी संस्था नियुक्ती करण्यात येईल. शिवाय प्रत्येक रुग्णालयात एक स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचीही चर्चा झाली. अनेक रुग्णालये रुग्णांना लाभ देण्यासाठी पळवाटा काढतात. हे थांबण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.” सुभाष देशमुख, सहकारमंत्री
बातम्या आणखी आहेत...