आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक ताडीविरोधातला आवाज अधिवेशनात उमटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील रासायनिक ताडीविरोधातला आवाज आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही जाणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी शासनाला जाब विचारण्याचे ठरवले. ताडी दुकानांतून रासायनिक ताडी विकली जाते. त्याने अनेक कष्टकऱ्यांचे जीव घेतले. त्यावर नियंत्रण आणण्याचे सोडून जिल्हा प्रशासनाने आणखी १५ दुकानांचा लिलाव केला. त्याच्या विरोधातला जनक्षोभ रस्त्यावर येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, रासायनिक ताडीची दुकाने बंद करावीत, अशी मागणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी या प्रकरणात आमदार शिंदे यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगितले.
सप्टेंबर महिन्यात ताडी दुकानात आणि त्याच्या बाहेर तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याची चाैकशी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाने संबंधित दुकानांतील ताडीचे नमुने घेतले. शासकीय प्रयोगशाळेला पाठवले. त्यात कुठलाच दोष नसल्याचा अहवालही मिळवला. याच काळात जिल्ह्यात तब्बल २३ हजार ताडीची झाडे असल्याचे उत्पादन शुल्क खात्याने जाहीर केले. तुलनेत विक्री केंद्रे कमी असल्याचे दाखवत १६ ऑक्टोबरला आणखी १५ दुकानांचे लिलाव केले. या प्रकरणात उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर यांना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पाठबळ दिले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मोर्चेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे प्रकरणा गांभीर्याने घेतले आहे. महसूल खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी चाैकशी करण्याचे आदेश दिले आहे. रासायनिक ताडीपासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे.

लोकांचा मोर्चा, लोकप्रतिनिधींचा विरोध, खुद्द पालकमंत्र्यांचाही विरोधी सूर या सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रचंड पोलिस बंदोबस्तात जिल्हाधिकारी बहुउद्देशीय कार्यालयात १५ ताडी दुकानांचा लिलाव झालाच.

उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लिलाव झालेल्या ताडी दुकानांना स्थगिती दिली. झाडांची गणना करण्याची सूचना केली. रासायनिक ताडी विक्री करणाऱ्यांवर मोक्का लावणार असल्याचे सांगितले.
शहरातील रासायनिक ताडी विक्रीच्या विरोधात मोची समाज युवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी त्याचे नेतृत्व केले होते.

सकाळी साडेआठच्या सुमारास विलास माढेकर या २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह मोदी येथील ताडी दुकानासमोरच आढळून आला. त्याची नोंद शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत झाली.

रासायनिक ताडी बंद करा
^शहरातील शासनमान्य ताडी दुकानांमध्ये रासायनिक द्रव्यापासून बनवलेली ताडी विकली जाते. त्याने अनेकांचे जीव घेतले. ही स्थिती असताना, राज्य उत्पादन शुल्क खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन १५ ताडी दुकानांचा लिलाव केला. त्याची संपूर्ण चौकशी व्हावी, सध्या सुरू असलेली दुकानेही बंद करावीत, अशी ठाम मागणी विधिमंडळ अधिवेशनात करणार आहे.'' प्रणिती शिंदे, आमदार