सोलापूर- सोलापुरात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी, हिंदी चित्रपट छोट्या पडद्यावर काम करणारे छोटे सेलिब्रेटी अर्थात बालकलावंतांचे मुख्य आकर्षण राहणार आहे. बालकलावंत रजनी यासह कार्यक्रमाच्या निमित्ताने ७० बालकलावंतांचा ताफा सोलापुरात दाखल होणार आहे.
या छोट्या सेलिब्रेटीमध्ये भूतनाथ रिटर्न किल्ला चित्रपटातील पार्थ भालेराव, संत तुकाराम मालिकेतील अवली म्हणजे मृण्मयी सुब्बल, एकापेक्षा एक फेम साक्षी तिसगावकर, कुटुंब चित्रपट फेम मिहिर सोहनी, राम मराठेंचा नातू, अव्दैत केतकर आणि त्याची बहीण गायिका अदिती केतकर, पंडित अजय जोगळेकर यांची कन्या कौशकी जोगळेकर, भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी आदी छोटी पण मोठे नाव असलेल्या बाल कलावंत मंडळींचा समावेश आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात ७० बालनाट्यकलावंतांचा ताफा नृत्यनाटय, लघुनाटिका गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. शालेय मुलांना हा कार्यक्रम मेजवानी ठरणार आहे.
चिंटू चित्रपटातील शुभंकर अत्रे, सुहानी धडपडे करणार निवेदन
या कार्यक्रमाचे निवेदन हे चिंटू चित्रपटातील शुभंकर अत्रे आणि मिनी म्हणजे सुहानी धडपडे करणार आहेत. त्या सोबत त्यांचा दोघांच्या स्किटचाही कार्यक्रम सादर होणार आहे.
असा असेल कार्यक्रम
या कार्यक्रमाची संहिता प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे यांची आहे. संकल्पना भाऊसाहेब भोईर यांची असून याचे दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. संगीत संयोजन मधुसूदन ओझा यांचे आहे. यामध्ये ते १५ वयोगटातील कलावंतांचा सहभाग आहे. नृत्य नाट्य लघुनाटिका आणि गीत गायन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
प्रत्येकाला आवडेल असा कार्यक्रम
लहानमुलेप्रचंड हुशार आहेत. केवळ त्यांच्याकडून काम काढून घेण्याचे कसब हवे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप छान अनुभव घेता आले. प्रत्येकाला आवडेल असा हा कार्यक्रम आहे. निकिता मोघे,दिग्दर्शिका