आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे; क्षमतेपेक्षा अधिक भरतीने जीव मुठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - अनधिकृतपणे जुनाट वाहनांतून होणारा विद्यार्थ्यांचा प्रवास, केबिनसह खचाखच भरलेल्या स्कूल व्हॅन, असुरक्षितरीत्या स्कूल रिक्षांमध्ये बसवले जाणारे विद्यार्थी, शाळेची कसलेही नियंत्रण नसलेली व्यवस्था, मदतीविना रस्ता ओलंडत कसेबसे घर गाठणारे विद्यार्थी अशी परिस्थिती आता शहरात नित्याची झाली आहे. शाळा, पालक वाहनधारकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
गेल्या आठवड्यात एका विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाने चिमुकलीचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिस विभागही आता सतर्क झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बैठक घेऊन स्कूल बस, व्हॅन रिक्षाचालकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात पाहणी केली असता सुरक्षा वाहतूक नियमावलीचे बहुतेक स्कूल बस, व्हॅन अॉटोरिक्षा पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही महिन्यांपूर्वी तुळजापूरला स्कूल बसमधून पडून विद्यार्थी जखमी झाला होता. तसेच उस्मानाबाद येथील शिवाजी चौकात स्कूल व्हॅनला आग लागण्याचा प्रकार झाला होता. त्यावेळी तर चालक गाडी सोडून पळून गेला होता. जवळ उभ्या असलेल्या काही युवकांनी धाडस करून विद्यार्थ्यांना बाहेर काढले होते. तसेच विनयभंगाची घटना तर ताजीच आहे. या घटना घडूनदेखील अद्याप कोणाचेच डोळे उघडलेले नाहीत. शाळा वाहनधारकांची बेफिकिरी कमी झालेली नाही.

सकाळी शाळेत आणताना परत नेतानाही स्कूल बस, व्हॅन रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: भरले जात आहे. प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जात आहे. कोणत्याही वाहनाच्या केबिनमध्ये प्रवाशाला बसवण्याचा मापदंड बहुतांश वाहनधारक पाळतात. येथे मात्र, हा नियमही धुळीस मिळवला जात आहे. काही स्कूल बस व्हॅनचालक आपल्या वाहनाच्या केबिनमध्ये पाच ते सात विद्यार्थी बसवतात. या प्रकारामुळे ते कसरत करत वाहन चालवतात. शहरात विविध कंपन्यांचे बस व्हॅन आहेत. त्यांची वेगवेगळी आसनक्षमता आहे. या अासनक्षमतेच्या तिप्पट विद्यार्थी वाहनात बसवले जात आहेत. या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे अधिकृत स्कूलबस व्हॅनही विद्यार्थ्यांना कोंबून नेण्यामध्ये मागे नाहीत. हा प्रकार जीवावर बेतणारा आहे. वाहतूक पोलिस आरटीओ विभागाने आता तरी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अपघात घडून गेल्यावर पंचनामे दु:ख केले जाते.
रिक्षांना परवानाच नाही
अनेक रिक्षाचालकही विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. तीन आसनी रिक्षांमध्ये १० ते १२ विद्यार्थ्यांना कोंबून बसवले जाते. त्यांचे दफ्तर बाहेर लाेंबकळत असते. असा प्रवास विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा असतो. विशेष म्हणजे रिक्षांना विद्यार्थी वाहतूक करण्याचा परवानाच नाही. तरीही मोठे धाडस करून रिक्षाचालक विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत.

पाठीवरच दफ्तर : नियमाप्रमाणे दफ्तर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था वाहनांमध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश वाहनांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरच दफ्तर असते. यामुळे वाहनात अधिकच दाटी निर्माण होते. काही स्कूलबस व्हॅनमध्ये अशी व्यवस्था आहे. मात्र, रिक्षा, काळीपिवळीत अशी व्यवस्था नाही.

वाहनांमध्ये नाही अग्निशमन यंत्रणा
काहीदिवसांपूर्वी नाशिकमध्ये स्कूलबसला आग लागली होती. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेतील वाहनांची तपासणी केली असता काही स्कूलबस व्हॅन वगळता वाहनामध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही. वायरिंग जळून तसेच दंगलीसारख्या आपत्कालीन स्थितीत आग लागण्याचे प्रकार घडू शकतात. तेव्हा मात्र, अग्निशमन वाहनाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसतो.

विनाहँडल दरवाजे
नियमानुसार स्कूलबस, व्हॅनला आपत्कालीन दरवाजा असण्याची गरज आहे. बहुतांश वाहनांना असे दरवाजे बसवण्यात आले आहेत. मात्र, या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला मूठ बसवण्यात आलेली नाही. यामुळे आपत्कालीन अवस्थेत बाहेरून दरवाजा काढणे अशक्य होते.

धक्कादायक वास्तव
शहरात काही काळीपिवळी जीप व्हॅनमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. काळीपिवळीत मागच्या डॉकमध्येच सुमारे १५ विद्यार्थी बसवले जातात. तसेच व्हॅनमध्ये २० विद्यार्थी बसवले जातात. विशेष म्हणजे या वाहनांवर स्कूलबस असल्याची कोणतीही खूण नसते. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशा वाहनांना मदत मिळू शकत नाही.

वाहनातील आसन व्यवस्थेत बदल
अधिक विद्यार्थी वाहनांमध्ये बसण्यासाठी आतील आसनांची व्यवस्था बदलण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. कंपनीने दिल्याप्रमाणेच आसन व्यवस्था ठेवली तर कमी विद्यार्थी बसतात. यामुळे असा प्रकार करण्यात आला आहे. असा बदल करण्याचा अधिकार वाहनधारकाला नाही. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी असा प्रकार सर्रास केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...