आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार राजे न्यायालयीन लढाईत पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - माजी नगराध्यक्ष तथा पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मकरंदराजे निंबाळकर यांना अपात्र ठरविण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी कायम केला. त्याचप्रमाणे त्यांना सहा वर्षे सर्व प्रकारच्या निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. मकरंदराजे राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. मात्र, त्यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास सहा वर्षासाठी अपात्र ठरवल्याने त्यांची अडचण झाली आहे.
माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या वडिलांच्या नावावर उस्मानाबाद शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक ८० मध्ये घर क्र.२२/६३ हे घर आहे. मात्र मकरंद निंबाळकर उपाध्यक्ष असताना, त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभारी पदभार होता. त्यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करून प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून बांधकाम परवाना भोगवटा प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांना नगर परिषद अधिनियम ५५ (अ) आणि ५५ (ब) नुसार अपात्र ठरवावे, अशी तक्रार मुळ तक्रारदार उदयसिंह राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर ही तक्रार राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आली. २७ जुन २०११ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने राजे निंबाळकरांचे बांधकाम बेकायदा असल्याचा मुख्याधिकाऱ्यांसह स्वत:चा अहवाल नगरविकास विभागाला सादर केला. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर शासनाने सुनावणी घेतली. सुनावणीनंतर मकरंद राजेनिंबाळकर यांनी बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका ठेवून शासनाने त्यांना डिसेंबर २०१५ रोजी अपात्र ठरवले. या निर्णयाला मकरंदराजे यांनी खंडपीठात अाव्हान दिले होते. या प्रकरणावर मंगळवारी (दि. १८) सुनावणी झाली. त्यानंतर खंडपीठाने शासनाचा मकरंद राजेनिंबाळकर यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला. तसेच त्यांना शासनाच्या आदेशाच्या तारखेपासून म्हणजे डिसेंबरपासून (२०१५) पासून सहा वर्षासाठी सर्व प्रकारच्या निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. याचिकाकर्ते मकरंदराजे निंबाळकर यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र देशमुख, मुळ तक्रारदार उदयसिंह राजेनिंबाळकर यांच्यातर्फे अॅड. एन. बी. खंदारे यांनी काम पाहिले. दरम्यान, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर मकरंदराजे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई कायम ठेवण्याचा उच्च निकाल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पुढे काय :मकरंदराजे यांचा शहरात प्रभाव अाहे. त्यामुळे त्यांनी नगराध्यक्षपदाची तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मकरंदराजे यांचे नाव स्पर्धेत होते. आता मकरंदराजे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरल्याने पक्षातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षातून जणांनी उमदेवारी मागितली होती. त्यापैकी मकरंदराजे अपात्र ठरले आहेत. ते न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत अवघ्या चार दिवसांवर अाल्याने त्यांना उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुनर्विचार याचिकेची तयारी
^उच्चन्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे किंवा उच्च न्यायालयातच पुनर्विचार याचिका दाखल करायची, यासंदर्भातील निर्णय तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार आहे. -मकरंदराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष

टळली होती अध्यक्षपदाची निवड
शासनाने मत विचारात घेता अपात्रतेची कारवाई केल्याची तक्रार करून मकरंदराजे यांनी डिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सरकारला फेरसुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर शासनासमोर झालेल्या सुनावणीमध्ये मकरंदराजे यांना पुन्हा अपात्र ठरविण्यात आले.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादीत मोठी दुफळी निर्माण झाली होती. मकरंदराजे यांचा गट काँग्रेस-सेनेच्या पाठींब्यावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरला होता. मात्र, मकरंदराजे यांच्या कारवाईला उच्च न्यायालयाने डिसेंबर रोजी पुन्हा स्थगिती दिली होती.त्यामुळे राजकीय भूकंप टळला होता.

निकालातील घडामोडी
डिसेंबर : नगरविकासराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या आदेशावरून अवैध बांधकामप्रकरणी मकरंदराजे अपात्र

डिसेंबर:जिल्हाधिकारीडॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर

डिसेंबर:राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या आदेशाला मकरंदराजेंकडून उच्च न्यायालयात आव्हान, नगराध्यक्षपदाला स्थगिती

डिसेंबर:न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी डाॅ.नारनवरे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार उपाध्यक्षांकडे सोपविण्याचे आदेश काढले,

१४ डिसेंबर :मकरंदराजेंच्या आव्हान याचिकेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती; नगराध्यक्षपदी मकरंदराजे कायम

१९ ऑक्टोबर :मकरंदराजे यांच्यावर शासनाने केलेली अपात्रतेची कारवाई कायम ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल.
बातम्या आणखी आहेत...