आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका सभेमध्ये पाण्यावरून नगरसेवक चेतन नरोटे आनंद चंदनशिवे या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळचे छायाचित्र.
सोलापूर - शहरात पिवळसर पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणी नदीच्या पात्रातून येत आहे. कर्तव्यात कसूर केल्याने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर महापालिकेने फौजदारी करावी, असा ठराव महापालिकेच्या विशेष सभेत एकमताने करण्यात आला. गुरुवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयुक्तांच्या मागणीनुसार बोलावण्यात आली होती. पिवळ्या पाण्यावर पाच तास चर्चा झाली. यावेळी नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.

पिवळसर पाण्यासह होम मैदान आणि सिटीबस चेसी क्रॅक प्रकरणी मनपाची विशेष सभा महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. मळी सोडणाऱ्या एकाही कारखान्यावर कारवाई झाली नाही. जिल्हाधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई करावी, असे नगरसेवक अनिल पल्ली म्हणाले. पाण्यावर राजकारण करता सर्वांनी एकत्र यावे, असे चेतन नरोटे म्हणाले.

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यासह विरोधी पक्षाचे मनपा प्रशासनावर वचक नाही, असे म्हणाले. त्यावेळी नगरसेवक नरोटे यांनी आक्षेप घेत चंदनशिवे यांना बोलण्यास बंदी करा, अशी मागणी महापौरांच्या समोरील हौद्यात जाऊन केली. आघाडीचे नगरसेवक एकत्र आले असताना चंदनशिवे आपल्या भूमिकेवर ठाम होते. एकेरी बोलण्यावरून नरोटे आणि चंदनशिवे यांच्यात शाब्दिक वाद झाला. नरोटे हे चंदनशिवेंच्या अंगावर धावून गेले. नगरसेवक अशोक निंबर्गी, सुरेश पाटील यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला.

नगरसेवक यू. एन. बेरिया यांनी मनपाला जबाबदारीची जाणीव करून देत शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असताना पूर्ण पाणीपुरवठ्याचे पैसे जनतेकडून वसूल केले जात असल्याचे सांगितले. पिवळ्या पाण्याबाबत नागरिकांत संताप आहे. नेते पाण्यासाठी एकत्र येत नाहीत, त्याचा फायदा प्रशासन घेतो. माणसे मरण्याची वाट कशाला पाहता, पोलिस ठाण्यात जाऊन पाणीपुरवठा विभागाने तत्काळ फिर्याद द्यावी, असे म्हणाले.

नगरसेवक प्रा. निंबर्गी म्हणाले, पाणी प्रश्नावर सोयीचे राजकारण केले जाते. महापौरांसह पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे बोलावले होते. स्थायी सभापती पद्माकर काळे वगळता कोणी आले नाही. पालकमंत्र्यांनी सहा बैठका घेतल्या. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाण्याच्या ४० चाचण्या का करत नाही. शासन कारवाई करेपर्यंत सभा चालवू नका असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची भूमिका मांडली. मनोहर सपाटे यांनी संबंधितावर फौजदारी करा, अशी मागणी केल्याने ती एकमताने मान्य झाली. यावेळी नगरसेविका खैरून्निसा सोडेवाले यांनी पाण्याबाबत अडचणी मांडल्या असता, उपअभियंता चौबे यांना निलंबित करू असे आयुक्तांनी सांगितले. नगरसेवक जगदीश पाटील, श्रीदेवी फुलारे, शैलेंद्र आमणगी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रदूषण मंडळ दोषी
सभागृहातबोलताना मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील म्हणाले, प्रदूषण मंडळावर कारवाई झाली पाहिजे असे राज्य शासनाकडे कळवणार आहे. पाण्याबाबत महापालिकेने वेळोवेळी कळवले आहे. महापालिका जबाबदारी टाळत नाही. योग्य वेळी खबरदारी घेतली आहे. पाण्याची तपासणी केली आहे. त्याची प्रत पोलिसांना दिली आहे. दूषित पाणी असेल तर पाणीपुरवठा बंद केला जाईल. औज येथील पाणी दूषित असल्याने ते शुद्ध करून देण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यानुसार केले आहे.

मैदानावरील रस्ता जानेवारी अखेरपर्यंत बंद
होम मैदानावरील हरिभाई देवकरण प्रशाला ते सिद्धेश्वर प्रशाला हा आपत्कालीन रस्ता ३१ जानेवारीपर्यंत सार्वजनिक वापरास बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका सभागृहात एकमताने करण्यात आला. महापालिका अधिनियम २०८ नुसार हा ठराव करण्यात आला. होम मैदान २९.११ वर्षे भाड्याने देण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे होता. त्यास बगल देत तो सार्वजनिक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सदर रस्त्यावर स्टाॅल उभारणीस अडचण दूर होण्यास मदत होईल. चेसी क्रॅक प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना सभागृहाने दिला. अशोक लेलँड कंपनीच्या ५९ बसच्या चेसी क्रॅक झाल्या. कंपनीकडील मत १० जानेवारीपर्यंत आले नाही तर न्यायालयात जाऊ असे महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी सभागृहात सांगितले.