आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: कामे सरस, मुख्यमंत्री आनंदी, दौरा मात्र घाईगडबडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला- आमच्या गावात जलसंवर्धनाची हिवरे बाजार, राळेगणसिध्दीपेक्षा सरस कामे झाल्याचे डोंगरगाव ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यामुळे आपण सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा आनंद मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा घाईगडबडीत झाला. त्यामुळे ते आले, त्यांनी पाहिले आणि गेेले, असाच हा दौरा होता. 

बुधवारी (दि. २३) मुख्यमंत्री फडणवीस यांनी तालुक्यातील मानेगाव, डोंगरगाव येथील जलयुक्त शिवार, कम्पार्टमेंट बंडिंग, विहीर पुनर्भरण, शेततळे, घरकुलाची कामे आणि अॅपल बोर लागवडीची पाहणी केली. मानेगाव येथील विठ्ठल भडंगे यांनी पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घराची पाहणी केली. 

मुख्यमंत्र्यांनी त्यांना किती हप्ते मिळाले, याची विचारणा केली. त्यावर त्यांनी ३० हजार ६० हजार असे दोन हप्ते मिळाल्याचे आणि तीन दिवसांत बांधल्याचे सांगितले. यापूर्वी झोपडीत राहत असल्याचे त्यांनी म्हटले. घराचे राहिलेले काम तत्काळ पूर्ण करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी भडंगे यांना दिल्या. 

जलपुनर्भरणामुळे पांडुरंग दशरथ बाबर यांच्या विहिराला पाणी होतेे. ते मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मानेगाव येथील हातीद रस्त्यावरील बाबर यांना मुख्यमंत्र्यांनी अॅपल बोर लागवड निवडीचे कारण विचारले. त्यावर बाबर म्हणाले, कमी पाण्यावर एका वर्षात हे फळ येते. मधुमेहाचा रुग्णही हे खाऊ शकतो. त्याला बाजारात चांगली मागणी, दरही आहे. डोंगरगाव येथील हरिबा खंडागळे यांचे शेततळे पाहिले. खंडागळे यांनी पावसाळ्यात हे शेततळे भरून घेऊन ठिबक सिंचनाद्वारे वर्षभर त्या पाण्याचा पिकांसाठी वापर करणार असल्याचे सांगितले. डोंगरगाव ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जलयुक्त शिवाराची कामे सरस झाली आहेत. त्यामुळे गाव यंदा टँकरमुक्त झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांत अन्नधान्य उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. 

गतवर्षी २५० मिलिमीटर पाऊस पडला होता. तेव्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. यंदा तो प्रश्न भेडसावत नाही. भविष्यात चांगला पाऊस झाल्यास गावाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी हस्तांदोलन करत त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. 

कम्पार्टमेंट बंडिंगवर झाडे 
सोलापूरपॅटर्नच्या नव्या कंपार्टमेंट बंडिंगमधील बांधावर झाडे लावून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. सांगोल्याचे जिल्ह्यात नाव आहे. चांगले काम करून राज्यातही पुढे या, असेही ते म्हणाले. सांगोला तालुक्यातील मानेगाव, डोंगरगाव येथील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...