आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद आणि साश्रुनयनांनी रंगला ‘लाेकमंगल’चा विवाह सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकीकडे वरपक्षाचा उत्साह आणि आनंद तर दुसरीकडे जा मुली तू दिल्या घरी सुखी राहा अशा भावनात्मक पाणावलेल्या डोळ्यांनी लोकमंगल फाउंडेशनचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवारी झाला. सायंकाळी सहाच्या गोरज मुहूर्तावर मान्यवर मंडळी, वऱ्हाडी आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या पटांगणात बरोबर सहा वाजता १४४ वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला.
दुपारच्या सत्रात वधूवरांची दोन मार्गांवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. एक मिरवणूक शहरी भागातून तर दुसरी मिरवणूक विजापूर रोड परिसरातून निघाली. दुपारी साडेतीन ते पाच यावेळेत वऱ्हाडींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला.

यावेळी मंचावर ‘लोकमंगल’चे प्रवर्तक आमदार सुभाष देशमुख, केजच्या आमदार संगीता ठोंबरे, डॉ. विठ्ठलराव लहाने, रोहन देशमुख, डॉ. सुधा कांकरिया, गणेश शिंदे, शहाजी पवार, इंद्रजित पवार, रेणुक शिवाचार्य, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, सुधाकर इंगळे महाराज, बसवराजशास्त्री हिरेमठ, माजी आमदार शिवशरण पाटील, अविनाश महागावकर यांच्यासह काही परदेशी पाहुणेही उपस्थित होते.

रांगोळीतून साकारण्यात आलेली शक्तीचे प्रतीक म्हणून १० फुटी तलवार, फुटी वीणा लोकमंगलचे बोधचिन्ह कासव यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वधूंना मेकअपसाठी ६० महिलांचा संघ वरांसाठी ५० नाभिक बांधव झटत होते.

अक्षतेनंतर हरवले सापडले
लग्नानंतर मुले हरविल्याच्या सूचना येऊ लागल्या. सहा बालके हरविली होती. हजारोंच्या गर्दीत काही कार्यकर्त्यांना मौल्यवान वस्तू सापडल्या. यात एक अॅपलचा आयफोन, रॅडोचे लेडीज घड्याळ याचा समावेश होता. हरविले आणि सापडले, आपली ओळख पटवून घेऊन जा, अशा सूचना जारी होत होत्या.

विवाह सोहळ्यात आमदार सुभाष देशमुख यांनी अक्षता पडण्यापूर्वी उपस्थितांना संबोधन करताना स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला. तसेच सर्वांकडून जोरदार आवाजात ‘भारत माता की जय’ पाच वेळा घोष करून घेतला. त्यानंतर ‘एक सबल सुंदर राष्ट्रासाठी आम्ही आज शपथ घेतो की, आम्ही आमचे घरअंगण, परिसर, गाव, शहर, राज्य देश स्वच्छ ठेवू’, अशी सर्वांकडून सामूहिक शपथ म्हणून घेतली. यामुळे समारंभास अधिकच रंगत आली होती. या शपथेपश्चातच वधू-वरांवर अक्षता पडल्या.

पुढील सोहळा जाहीर
पुढील सामुदायिक विवाह सोहळा मार्च २०१६ रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. इच्छुकांनी लोकमंगलच्या कार्यालयात नावनोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले. हा २३ वा विवाहसोहळा आहे.