आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारीत सोलापुरात स्पर्धा परीक्षा संमेलन; संमेलनाचे निमंत्रक डॉ. आनंद पाटील यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नवव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन १०  व ११ फेब्रुवारी रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रणेते, संमेलनाचे निमंत्रक व प्रवर्तक डॉ. आनंद पाटील यांनी पत्रकारांना दिली. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट संस्था स्टडी सर्कलच्या द्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्य करते. गत आठ वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने साहित्य संमेलन आयोजिले जात आहे. यंदाचे हे 

नववे वर्ष आहे.


यंदा या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरचे अजित जोशी असतील. गत आठ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, शेखर गायकवाड, रंगनाथ नाईकडे, सुधीर ठाकरे, प्रवीण दीक्षित आदी मान्यवरांनी भूषविले आहे. गत साहित्य संमेलन ठाणे येथे भरवण्यात आले होते. यावेळी भारतीय वनसेवेचे ज्येष्ठ अधिकारी, सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे म्हणाले, २०१० पासून मी या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाशी संबंधित आहे. शुद्ध हेतूने ही चळवळ पुढे नेत आहोत, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून पाठिंबा लाभत आहे. अजित जोशींसारखे तरुण, कर्तबगार अध्यक्ष लाभल्यामुळे हे संमेलन नक्कीच महाराष्ट्रातील उमेदवार यूपीएससी परीक्षेत देशात प्रथम येण्याचे आमचे स्वप्न खरे करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरणार आहे.

 

बोधचिन्हात विठ्ठलरूप
नववे साहित्य संमेलन सोलापुरात भरत आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा जिल्हा. विठ्ठल हा असा देव आहे, ज्याने आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांमध्ये आत्मविश्वास जागवला. आपल्या भक्ताला सक्षम बनविले. या सक्षमीकरणातच महाराष्ट्राची थोर संत परंपरा लपलेली आहे. विठ्ठलाच्या सक्षमीकरणामुळे या संतांनी प्रचलित व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले. तिच्याशी संघर्ष न करता स्वतंत्र अशी स्वयंभू विचारधारा जोपासली व विकसित केली. आधुनिक काळात प्रशासन हे जनतेच्या विश्वासस्थानी, केंद्रबिंदू बनून सक्षम असले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर नव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह अस्तित्वात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...