आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर : गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
पंढरपूर - वैकुंठीतो एैसे नाही। कवळ काही काल्याचे।
एकमेकां देऊं मुखी, सुखी घालू हुंबरी।।
यासंत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव आज झाला. गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केलाच्या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर कीर्तन झाले. पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोला चा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पहाटे सहाच्या दरम्यान शिस्तीने आगमन झाले. पहाटे पासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या.
सकाळी साडेनऊच्या सुमारात श्री संत तुकाराम महाराजांची तर पावणे दहाच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराच्या जवळ पालख्या विसावल्या होत्या.
भाविक मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. कीर्तन करून वारकरी एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेत होते. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते. गोपाळपूर ग्रामपंचायतीने पाण्याची आणि विजेची सोय केली. गोपाळपूर मंदिराचा परिसर प्रकाशाने उजाळून निघाला होता.