आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बैठकीला अनेक नगरसेवकांनी मारली दांडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महापालिकेची निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. महापालिका निवडणूक हातून निसटू नये यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पक्षाने नगरसेवकांची बैठक बोलावली. मात्र १२.३० वाजले तरी ४५ पैकी केवळ १५ नगरसेवक आले. वाट पाहून पक्ष निरीक्षकांनी अखेर बैठक सुरू केली. नंतर एक एक करत नगरसेवक आले. जेवढे आले तेवढ्यातच समाधान मानत बैठक उरकण्यात आली. पक्ष निरीक्षक मोहन जोशी यांच्या म्हणण्यानुसार शेवटपर्यंत एकूण ३२ नगरसेवक आले.
काँग्रेस भवन येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद आणि ११.३० वाजता नगरसेवकांची बैठक असे नियोजन केले हाेते. पक्षश्रेष्ठी आणि निरीक्षक वेळेवर पोहोचले. नगरसेवक येत नसल्यामुळे पत्रकारांसोबत चहा घेत वेळ घालवण्याची पाळी श्रेष्ठींवर आली. चहा घेता घेता नगरसेवक आले का अशी विचारणा वारंवार करण्यात येत होती.

अखेर बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, अनिल पल्ली, अविनाश बनसोडे, दत्तू बंदपट्टे, मधुकर आठवले, विनोद गायकवाड, राजकुमार हंचाटे, मेघनाथ येमूल, विवेक खरटमल, श्रीदेवी फुलारे, अश्विनी जाधव, मंदाकिनी तोडकरी, रियाज हुंडेकरी, अलका राठोड आदी १५ नगरसेवक उपस्थित राहिले. या नगरसेवकांना घेऊन बैठक सुरू करण्यात आली. नंतर अनिता म्हेत्रे, फिरदोस पटेल, जगदेवी नवले, कल्पना यादव, आरिफ शेख, शिवलिंग कांबळे, चेतन नरोटे या सात नगरसेवकांनी उपस्थिती लावली.

पत्रपरिषदेत राजू वाघमारे म्हणाले, ‘भाजप सरकार लोकशाहीआडून हुकूमशाही आणू पाहात आहे. परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्रभाग रचना झाली आहे. प्रारूप रचना जाहीर होईल तेव्हा आम्ही त्या रचनेवर आक्षेप घेऊ.’
^मी नगरसेवकांशीवैयक्तिक संपर्क साधला आहे. घरगुती अडचणी आणि काही जण आजारी असल्याने आले नाहीत. मोहनजोशी, पक्ष निरीक्षक

५६ इंची छाती पोकळ
निवडणुकी पूर्वी नरेंद्र मोदी यांनी खूप वल्गना केल्या. आता भाजपच्या सत्ताकाळात पाकिस्तानी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांची हिंमत वाढल्यासारखे चित्र आहे. यावरून मोदी यांची ५६ इंची छाती पोकळ असल्याचे भारतीयांना समजले आहे, अशी टीका कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत हाेतेे.

अंतर्गत गटबाजी नसावी, काम बघून द्या उमेदवारी
दुपारी पदाधिकारी आणि कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. कार्यकर्त्यांनी पुढील मते मांडली. गेल्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती त्यापैकी बऱ्याच आश्वासनांची पूर्तता झाली आहे. उर्वरीत तीन महिन्यात शंभर टक्के पूर्तता करून आपण मतदारांसमोर जाऊ, अंतर्गत गटबाजी नसावी, प्रामाणिक कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ नये, आया राम-गया रामला संधी देऊ नये, तोंड पाहता काम पाहून उमेदवारी द्यावी, काँग्रेसने जी कामे केली आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...