आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये वाढली चुरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची सदस्य संख्या अधिक असून विधान परिषदेत काँग्रेसचा उमेदवार असावा, असा आमचा आग्रह आहे. पक्षाकडून संधी मिळावी, असे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढत असून शहराध्यक्ष यलगुलवार यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा आमदारकीकरता शड्डू ठोकला आहे.
हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. याची माहिती माहिती देण्यासाठी शुक्रवार कॉग्रेसभवनात शहराध्यक्ष यलगुलवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विधान परिषदेच्या तयारीचीही माहिती दिली.

यलगुलवार म्हणाले विधान परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसची सदस्य संख्या अधिक असून ज्यांची सदस्य संख्या अधिक त्यांना उमेदवारी या मुद्यावर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे विधान परिषदेसाठी माजी आमदार दिलीप माने जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी इच्छा व्यक्त केली आहे. दोघांनी त्यांची भूमिका पक्षापुढे मांडली असून त्याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकसंदर्भात विचारले असता, सहकार क्षेत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी जिल्ह्यात कार्यरत असून तेच योग्य निर्णय घेतील.

पक्षाच्या स्टार प्रचारकमध्ये माझा समावेश असून प्रदेश पातळीवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मला मुक्त करून सक्रिय तरुणास संधी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. शहराध्यक्ष पदासाठी २२ जण इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे संकेत असल्याने शहराध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर, मी इच्छुक असून त्या सुवर्णसंधीच्या प्रतीक्षेत असल्याचे यलगुलवार यांनी स्पष्ट केले.

काळे, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील यांचीही नावे चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढत आहे. माजी आमदार दिलीप माने जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी “गाॅडफादर“ मार्फत फिल्डिंग लावली आहे. कल्याणराव काळे पुन्हा इच्छुक असून तिकीट फिक्स असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. शहराध्यक्ष यलगुलवार यांनी शुक्रवारी अपेक्षा व्यक्त केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अन् आगामी महापालिका निवडणूक या दोन्हीची सांगड घालण्याचे मोठे आव्हान काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सतेज पाटील सोलापुरातून इच्छुक आहेत. स्थानिकांमधील मतभेदाचा तिढा सोडवण्यास उपरा उमेदवार देणार की मित्र पक्षाला संधी देऊन महापालिका निवडणुकीसाठीचे भविष्यातील अडथळे दूर करून घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.