आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद‌ग्रस्त अभियंता सय्यद यांचा पदभार काढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मुख्यालयातचठाण मांडून बसण्यामुळे वाद्‌ग्रस्त ठरलेले जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील प्रभारी उपकार्यकारी अभियंता ओ. के. सय्यद यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. आता या पदाचा पदभार शुक्रवारी (दि. १७) शाखा अभियंता हरिभाऊ शेगर यांच्याकडे देण्यात आला आहे.

वास्तविक पाहता वाद्‌ग्रस्त उपकार्यकारी अभियंता सय्यद यांची कळंब येथील पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून नेमणूक आहे. मात्र, अधिकाऱ्यांना "खिशात' घालून मुख्यालयातच ठाण मांडण्याचे कसब सय्यद यांनी साध्य केलेले आहे. यामुळे विविध कारणांवरून गेल्या दहा वर्षांपासून सय्यद मुख्यालयातच बसले हाेते. प्रभारी उपकार्यकारी अभियंता म्हणून संपूर्ण बांधकाम विभागावर त्यांचा अंमल होता. मुळात त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर, नियमबाह्य होती. यासंदर्भात "दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनीही यासंदर्भात तक्रार सादर केली.सध्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांना सय्यद यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. "दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केल्यावर तसेच धुरगुडे यांच्या तक्रारीनंतर त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांना बातमीत तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने शुक्रवारी सय्यद यांची उचलबांगडी करून कळंबला जाण्यास सांगितले. त्यांच्याजागी पदभार घेण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागाचे शाखा अभियंता हरिभाऊ शेगर यांना आदेशित केले. त्यानुसार शेगर यांनी पदभार स्वीकारला आहे. यामुळे अगोदरच विविध कारणांमुळे बदनाम झालेल्या बांधकाम विभागातील एका वाद्‌ग्रस्त प्रकरणावर पडदा पडला आहे.

शेगर यांची सेवाज्येष्ठता
एमआरईजीएसविभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले शेगर यांची उपलब्ध अभियंत्यांमध्ये अधिक सेवाज्येष्ठता आहे. तरीही अधिकाऱ्यांच्या मेहेरनजरमुळे सय्यद उपकार्यकारी अभियंता पदावर ठाण मांडून बसले होते. यामुळे शेगर यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला होता. अखेर सीईओ रावत यांनी सय्यद यांची उचलबांगडी करून शेगर यांनाही न्याय दिला आहे. त्यांचे कार्यालयात पदभार स्वीकारताना कर्मचारी अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. शुक्रवारी कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते.

सर्वसाधारण सभेत वाद
नुकत्याचझालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्येही सय्यद यांच्या नियुक्तीवरून चांगलेच रणकंदन झाले होते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सय्यद अनुभवी आहेत, यामुळे त्यांना येथे नियुक्ती देण्यात आली आहे, असे सांगून त्यांना पाठीशी घातले होते. बड्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर चर्चाच घडू दिली नाही. कामे मिळत असल्यामुळे काही सदस्यांनाही बोलता येत नव्हते. आता सय्यद यांची उचलबांगडी झाल्याने या सदस्यांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. सय्यद मुख्यालयात असल्यामुळे कळंब येथील काम खोळंबलेली होती. आता या कामाला गती येणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...