आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर कर्जबुडव्यांना बसेल धाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धायफुले उद्योग समूहाच्या गौरी कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग मिलला सोलापूर जनता सहकारी बँकेने १७ कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्याचा विनियोग अन्य कामासाठी करून संचालकांनी बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी धाडसी कारवाई केली. त्याने नागरी सहकारी बँकांना बळ मिळाल्याचे जनता बँकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे म्हणाले.
कर्जे घ्यायची. मुद्दाम थकवायचे आणि न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून दावा लांबवायचा, असा प्रकार बँकांमध्ये काही कर्जदारांकडून सुरू झाला अाहे. न्यायालयीन बाब म्हणून त्यात हस्तक्षेप होत नसल्याने थकबाकीदार निश्चिंत झाले. त्यांच्यावर धाकच राहिला नाही. अशा स्थितीत जनता बँकेने धायफुले उद्योग समूहाच्या संचालकांविरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिली. श्री. सेनगावकरांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास दिला. प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात उभे केले. पोलिसांच्या सहकार्यामुळेच ही कारवाई झाली. त्याने नागरी बँकांत कर्ज थकवण्याच्या प्रक्रियेला आळा बसेल, अशी अपेक्षा श्री. देशपांडे यांनी व्यक्त केली.

जिल्हाबँकेत असेच प्रकार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकबाकीदारांची अशा प्रकारची अनेक प्रकरणे आहेत. परंतु बँकेकडून होणारी कारवाई कासवगतीची आहे. थकबाकीदार असलेल्या साखर कारखान्यांनी बँकेकडे तारण असलेली साखर परस्पर विकली आहे. मालमत्ता बँकेच्या ताब्यात असूनही दुसऱ्या बँकेत पुन्हा गहाण ठेवली आहे. गोदामात साखरेच्या नावाखाली रिकाम्या पोत्यात कचरा भरला, अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली. परंतु फसवणुकीचा गुन्हा नाही, संबंधितांना अटकही झाली नाही. उलट कर्ज दिलेल्या इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कारखान्यांच्या मालमत्तेवर दावा सांगितला आहे.

बँकेकडे तारण असणारी जमीन परस्पर विकणे, बँकेच्या परवानगीशिवाय कच्चा पक्का माल विकून विल्हेवाट लावणे असे प्रकार वाढले आहेत. बँकांच्या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेऊन दावे प्रलंबित ठेवणे हे तंत्रही काहींना जमले आहे. त्यामुळे बँकांच्या अनुत्पादक कर्जाच्या प्रमाणात (एनपीए) वाढ होत चालली. अशा प्रकरणांत संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्याने प्रतिष्ठेपायी प्रकरणे थांबतील, असा विश्वास तज्ज्ञ संचालकांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...