आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडे येणार सांगलीचे पालकत्व?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - राज्याचे नवे सहकारमंत्री सुभाष देशमुख सांगलीचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. कारण या खात्याचे मंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. देशमुख यांच्याकडे सहकार खाते दिल्यानंतर सांगलीचे पालकमंत्रिपदही देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यातून पश्चिम महाराष्ट्रात सहकार वाढवण्याचे संकेतही आहेत.

राज्यमंत्री विजयकुमार देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. पुन्हा पालकमंत्रिपद दिल्यास विजयकुमार देशमुख नाराज होतील. आगामी महापालिका निवडणूक पाहता, भाजपला अंतर्गत गटबाजी परवडणारी नाही. त्यामुळेच सुभाष देशमुख यांना सांगलीचे पालकमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र हा साखरपट्टा आहे. देशमुख स्वत: कारखानदार अाहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य पश्चिम महाराष्ट्रात आहे. बहुतांश साखर कारखाने आणि सहकारी बँका त्यांच्या ताब्यात आहेत. देशमुखांना साखर कारखानदारीचा अभ्यास आहे. सहकार खाते त्यांच्याकडे आल्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात ताकद वाढवण्याची संधी मिळू शकते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था साखर कारखाने हे राष्ट्रवादी काँगेसच्या ताब्यात आहेत. आता या खात्याचे मंत्री हे भाजपचे आहेत. त्यांच्याबाबत सुभाष देशमुख यांची कार्यपद्धती कशी असेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

उस्मानाबादची जबाबदारी का नाही?
खरे पाहता, सुभाष देशमुख यांचे उस्मानाबादशी व्यावसायिक राजकीय संबंध चांगले आहेत. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात देशमुखांनी चिरंजीव रोहन देशमुख यांना उभे केले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये राजकीय धुसफूस आहे. विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना पाडण्यासाठी गायकवाड यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात सभा घेतली होती. ही समीकरणे पाहता, उस्मानाबादचे पालकमंत्रिपद शक्यच नाही.
बातम्या आणखी आहेत...