आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक म्हणाले, लोक झोपू देईनात, आमची झोपच उडाली, रात्री अपरात्री घरावर अाणतात मोर्चे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरिक पाण्यासाठी शिव्या घालतात, रात्री-अपरात्री घरावर तसेच नोकरीच्या ठिकाणी मोर्चा घेऊन येत आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांची झोप उडाली आहे, असे सांगत गुरुवारी महापालिका सभागृहात सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले. दरम्यान २५ एप्रिलपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी सभागृहाला दिले. शिवाय तीन दिवसांपूर्वी पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे म्हणणारे आयुक्त आज चार दिवसांआड करण्याचा निर्णय घेऊ असे म्हणाले.

महापालिकेची फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील तहकूब सभा गुरुवारी महापौर सुशीला आबुटे यांनी बोलावली. पाण्याच्या प्रश्नावरून बुधवारी सभागृहात राजकारण करणारे नगरसेवक गुरुवारी चर्चेत बोलताना दिसले.

पाण्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी लक्षवेधीची मागणी केली. जयंती मिरवणुकीच्या निमित्ताने महापालिकेचे पाण्याचे नियोजन काय असा सवाल नगरसेवकांनी केला. शहरासाठी उजनी औजमधून ११० एमएलडी पाणी रोज उचलतो. पण ते पाणी देण्याचे नियोजन सुरू करावे. सात दिवसासाठी प्रति नागरिक सहाशे एमएलडी पाणी मनपा देते.
पणे आणले जाते हजार एमएलडी पाणी. ४०० एमएलडी पाण्याचे हिशेब लागत नाही. हद्दवाढ भागात पाण्याची टंचाई तीव्र अाहे. तर दुसरीकडे पाण्याचे टँकर विकले जातात. जोडभावी पेठेत पाणी पुरवठा अर्धवट झाला, त्यामुळे पुन्हा पाणीपुरवठा करा. हद्दवाढ भागातील नगरसेवकांना दहा बोअर द्या, २२ टाक्या भरत नाहीत. ३०० कोटी खर्च करूनही पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. स्मार्ट सिटीत हा प्रकार योग्य नव्हे असा जाब नगरसेवकांनी विचारला.
पाणीप्रश्नावर नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, मनोहर सपाटे, अॅड. यू. एन. बेरिया, आनंद चंदनशिवे, चंद्रकांत रमणशेट्टी, बिसमिल्ला शिखलगार, खैरून्निसा सोडेवाले, अनिता म्हेत्रे, सुवर्णा कारंडे, सुनंदा बल्ला, पैगंबर शेख, सुनीता भोसले, रोहिणी तडवळकर, उदय चाकोते, मोहिती पत्की आदीनी आक्रमकपणे मत मांडले. मनपा सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी हद्दवाढ भागातील प्रभागात चार तर शहरात दोन बोअर देण्यात येईल.तसेच चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा, असे म्हणणे मांडले.

मुख्य लाइनवरील पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न
यावेळी बोलताना आयुक्त काळम पाटील म्हणाले, एमआयडीसीला सहा दिवसांची नोटीस देऊ. टँकर पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येईल. टँकरवर उपाय दोन दिवसात करू. मुख्य लाइनवरील पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार आहे. अमृत योजनेसाठी टेंडर काढण्यात येणार आहे. पाण्यासाठी जास्त निधी देण्यात येईल. दोन दिवसात पाणी सुरळीत करण्यात येईल. गढूळ पाणी शुद्ध केले जाईल. पुढील दाेन महिने पाणीपुरवठा करण्याची कसोटी असणार आहे.

लोक शिव्या घालतात, जेवण करू देईना : इंदिरा कुडक्याल
भाजपच्या नगरसेविका इंदिरा कुडक्याल बोलताना आक्रमक झाल्या. लोक शिव्या घालत आहेत. जेवण करू देत नाहीत. शाळेत मोर्चा घेऊन येतात, असे आयुक्तांना सांगत असताना महापौरांनी थांबवले. त्यावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी अर्धा तास सभागृहाचे कामकाज रोखले. भाजप नगरसेवकांना महापौरांनी सन्मानाने वागवावे. आम्ही चोर नाही, आमचा हक्क आहे, असे म्हणणे प्रा. निंबर्गी यांनी मांडले. सभागृह नेते संजय हेमगड्डी, आरिफ शेख, चेतन नरोटे यांनी मध्यस्थी केल्याने कामकाज सुरू झाले.

तीन दिवसांआड पाण्याचा
बेरियांचा राहिला आग्रह

पाणीपुरवठ्याबाबतनागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्यासमोर आम्हाला जायचे आहे.औज आणि उजनीतून आज जितके पाणी उपसा करता तितकाच पुरवठा करा पण त्याच पाण्यात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करून द्या. तीन दिवसांआड पाणीपुरवठा होतो का नाही ते सांगा, असा आग्रह नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी महापौरांनी बोलावलेल्या पाण्याच्या बैठकीत धरला. तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे मत प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता राजकुमार रेड्डी यांनी सांगितले. त्यावेळी नगरसेवक बेरिया यांनी प्रशासनाचा निषेध करीत सभात्याग करत असल्याचा पवित्रा घेतला. महापौर आबुटेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. नागरिकांना पाणी देणार नसाल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको, अशी भूमिका बेरिया यांनी घेतली. आयुक्तांनी आपले मत मांडले. त्यानंतर चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे ठरले.

औज बंधाऱ्यातील पाणी ५२ दिवस पुरेल
शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा २५ एप्रिलपर्यंत सुरळीत होईल. त्यानंतर चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा विचार आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास औजमधील पाणी ५२ दिवस पुरेल. विजयकुमार काळम-पाटील