आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption Case On Tow Police Officers In Osmanabad

लाचखोर पीआय, एपीआय एसीबीच्या जाळ्यात, पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा- बेकायदेशीरपणे अनुदान लाटणाऱ्या शिक्षणसंस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ५० हजार रुपये स्वीकारणारे पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत.

लाचलुचपत खात्याच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज महादेव भीमाळे यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड फरार झाल्याचे समजते. दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक (एसीबी) अश्विनी भोसले करीत आहेत. तक्रारदार लोहारा ठाण्यातील पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड यांना भेटले असता त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करून सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज भीमाळे यांना भेटून त्यांना रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदाराने भिमाळे यांची भेट घेतल्यावर त्यांनी तूर्तास ५० हजार रुपये आणून देण्यास सांगितले. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, उस्मानाबादला दिली. तक्रारदाराची ही तक्रार नोंदवून १३ एप्रिल २०१६ रोजी एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी त्यांचे सहकारी पोलिस निरीक्षक आसिफ शेख, बाळासाहेब आघाव आदी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सापळा रचला. त्याप्रमाणे मंगळवारी (दि.१९) शाहूराज भीमाळे यांनी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून स्वत:च्या घरी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी प्रोत्साहन देऊन लाच स्वीकारण्यास सहमती दिल्याने एसीबीने दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार कारवाई केली आहे.