आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांमुळे १० पक्षी आढळले जखमी अन् भेदरलेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्या दिवाळीत जोरदार आवाजाच्या फटाक्यांमुळे शहर आणि परिसरात १० हून अधिक पक्षी जखमी भेदरलेल्या स्थितीत आढळून आले. स्थानिक पक्षीमित्रांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक पक्ष्यांना मोठ्या आवाजाच्या त्रासामुळे स्थलांतरित व्हावे लागले. तसेच, फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटनांमध्येही यंदा वाढ झाली.

दिवाळीत सणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात येतात. या आवाजांची काही भागात फारशी तीव्रता नसली तरी एकाच वेळी सर्वत्र फटाक्यांचा आवाज असल्याने त्याचे परिणाम पक्ष्यांना भोगावे लागले. ठिकठिकाणची झाडे म्हणजे पक्ष्यांचे विश्रांतीस्थान. अचानक फटाक्यांची माळ उडाल्यामुळे भीती निर्माण होऊन ते आकाशात घिरट्या घालत राहिले. त्याच दरम्यान एखादा रॉकेट किंवा उंचावर फुटलेल्या फटाक्यामुळे मोठ्या इमारतींना धडकून खाली पडण्याचे प्रकार घडले.

भवानीपेठ परिसरात मोठ्या आवाजामुळे एक पारवा पक्षी जमिनीवर पडला. बराचवेळ तो उडूच शकल्याने नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलकडे त्यास देण्यात आले. पार्क चौक परिसरातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस फटाक्यांच्या आवाजामुळे घार जमिनीवर पडली. आवाजामुळे घाबरलेली ती घार एक कोपऱ्यात बराचवेळ बसून होती. कुत्र्यांकडून त्यास धोका होण्याची शक्यता असल्याने त्यास निसर्गप्रेमींच्या ताब्यात दिले. आजही ती घार घाबरलेल्या अवस्थेतच आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विजापूर रस्त्यावरील रामलिंगनगर परिसरात एक मुनिया पक्षी जखमी अवस्थेत आढळला. फटाक्यामुळे त्याच्या पंखास इजा झाली. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे भोवळ येऊन पडलेल्या सहा ते सात पक्ष्यांवर उपचार करून नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी निसर्गात त्यांना मुक्त केले. फटाक्यांमुळे झाडांवर नेहमी दिसणारे अनेक पक्षी दिवाळीच्या कालावधीत दिसलेच नाहीत. यामध्ये प्रामुख्याने चिमणी, बुलबुल, शिंजीर, वटवाघूळ या पक्ष्यांचा समावेश होता.

उपचार सुरू आहेत
^फटाक्यांमुळे गेल्या पाच दिवसांमध्ये दहा ते बारा पक्ष्यांवर उपचार केले आहेत. दोन पारवे, एक घार अद्याप फारच घाबरलेल्या अवस्थेत असून त्यांच्यावर आणखी उपचार सुरू आहेत. फटाक्यांच्या आवाजामुळे काही पक्ष्यांनी त्यांचा अधिवास सोडल्याचे दिसून आले.'' पप्पू जमादार,
नेचरकॉन्झर्व्हेशन सर्कल