आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख रुपये लांबविणारा गजाआड, रक्कमही जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गर्दीचा फायदा घेऊन काउंटरवरील दोन लाख रुपये लंपास करणाऱ्या एका तरुणाला मुरूम पोलिसांनी ४८ तासांमध्ये गजाआड केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती काढत गुरुवारी (दि.११) सायंकाळी त्याला तालुक्यातीलच कलदेवनिंबाळा येथून ताब्यात घेतले आहे.

दि. रोजी येणेगूर येथील शरण कलशेट्टी हे मित्राने बँकेत भरण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये घेऊन येणेगूरच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गेले होते. रक्कम काउंटरवर ठेवून उभारले असताना त्यांना फोन आला. यावेळी फोनवर बोलत ते बाहेर गेले. फोन संपल्यानंतर परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, काउंटरवरील रक्कम लंपास करण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण सदरील रक्कम उचलून घेऊन गेल्याचे दिसत होते. परंतु, अस्पष्ट चित्रणामुळे अडचणी कायम होत्या. परंतु, मुरूमचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यासह येणेगूर चौकीतील कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस एक करून सीसीटीव्ही फुटेज परिसरातील गावांमध्ये फिरविले. यातूनच आरोपीचा उलगडा होऊन तो कलदेवनिंबाळा येथील मनोज तुकाराम कांबळे हा असल्याचे समोर आले. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून चोरलेली रक्कमही जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. एस. लोंढे, कर्मचारी संजय भंडारकवठे, डी. के. सूर्यवंशी, महादेव शिंदे यांनी यशस्वी केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.