आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळविक्रेत्याची वार करून हत्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला मारेकऱ्याचा चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एसटीस्टॅण्ड परिसरात फळ विक्री करून सायंकाळी घरी जात असताना सागर अॅटोगॅस सेंटर समोर किरण लकुळ अष्टुळ (वय ३४, रा. मनोहर नगर झोपडपट्टी) यास अज्ञात इसमाने भर रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अष्टुळ हा एसटी स्टॅण्ड समोरील परिसरात चारचाकी गाडीवर फळविक्रीचा व्यवसाय करतो. तो नेहमी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फळ विक्री बंद करून घरी परतायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तो फळ विक्री बंद करून घरी निघाला. फळांची गाडी ढकलत घरी जाताना सागर अॅटोगॅस सेंटरसमोर मागून आलेल्या एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने अष्टुळ याच्या मानेवार वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

घरचाकर्ता पुरुष गेला
किरणलाआई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. सर्व भांवडांच्या चुली वेगळ्या असल्या तरी सर्वजण एका ठिकाणी मिळून राहतात. किरणच्या घरात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. मोठी मुलगी पंधरा वर्षाची नववीत शिकत आहे. सर्व मुले शिक्षण घेत असून मुलाला उच्च शिक्षण देण्याचे किरणचे स्वप्न होते. घरचा कर्ता माणूस गेल्यामुळे किरणचा संसार रस्त्यावर आला आहे.

सीसी टीव्हीत कैद आरोपीचा चेहरा
एसटीस्टॅण्ड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. रात्री अकरा वाजेपर्यंत या परिसरात वर्दळ असते. अशा परिस्थितीत कोणी अज्ञात इसम येतो आणि भर रस्त्यावर एकावर वार करतो आणि त्याला कोणी पकडत नाही, पाहात नाही हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखे घडले. मात्र, आधुनिक तंत्राने घटनेचा आणि आरोपीचा चेहरा टिपला. आडवा नळ चौकात दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना आणि मारेकऱ्याचा चेहरा कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासातून संशयित आराेपीस पकडणे पोलिसांना सोपे जाणार आहे.