आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढ्याच्या उपनगराध्यक्षांसह पाच जणांविरूध्द वाळूचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
मंगळवेढा- घरनिकी (ता. मंगळवेढा) येथील माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू घेऊन जाणारे सहा टिपर वाळूसह पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्यासह पाच वाहन मालक व चालकांविरूध्द पोलिस नाईक हरिदास सलगर यांनी फिर्याद दिली आहे. वाळूचोरी तसेच शासकीय कामात अडथळा आणणे व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दि.11 रोजी सायंकाळी 6 वाजता माण नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू घेऊन सहा वाहने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घरनिकी गावाजवळ पोहोचताच काही वाहनचालकांनी टिपरमधील वाळू जागेवरच ओतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी सहा वाहनांना गराडा घातल्याने वाहनचालकांची चांगलीच गोची झाली. पोलिसांनी टिपर क्र एम.एच-13.ए.एक्स-2938, टिपर क्र एम.एच-13. ए.एक्स-2205, एम.एच-24.7102, एम.एच-13.ए.एक्स-2938, एम.एच-13. ए.एक्स 2205, एम.एच-24.7102 ही सहा वाहने वाळूसह ताब्यात घेऊन मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावली आहेत.
 
उपनगराध्यक्ष दुचाकीवरुन फरार
वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत राजाराम घुले, दादासाहेब एकनाथ तानगावडे (वय 40, रा.गणेशवाडी), संदीप त्रिंबक आसबे (वय 29, रा.मंगळवेढा), सचिन धनाजी ताकभाके (वय 25, रा.ब्रम्हपुरी), सचिन माणिक घुले, कांतीलाल अण्णा दत्तू आद या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे हे शासकीय काम करीत असताना उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी तेथे येऊन एम.एच-13.ए.एक्स-2938 हा टिपर माझा चुलत भाऊ सचिन घुले याचा असून तो सोडून द्या, मी नगरसेवक आहे अन्यथा तुम्हाला त्रास होईल असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी चंद्रकांत घुले यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मोटारसायकलवर स्वार होवून पलायन केले. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
 
वाळु तस्करांचे धाबे दणाणले
पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहेत. भा.दं.वि.सं.कलम 379, 34, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...