आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांशी झटापट, मोबाइलला लागली रिव्हॉल्व्हरमधील गोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात विक्रीसाठी आणलेले रिव्हॉल्व्हर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून जप्त केले. यावेळी एका तरुणाने केलेल्या गोळीबारात पोलिसाच्या मांडीला छरे चाटून गेले. पोलिसाच्या खिशात असलेल्या मोबाइलमुळे गोळी त्याला चाटून बाजूला गेली. अन्यथा अप्रिय घटना समोर आली असती. इंडी तालुक्यातील चडचण येथील चौघांना अटक करण्यात आली आहे.

काशिनाथ मल्लप्पा गोळगी (वय २५, रा. लक्ष्मीनगर, चडचण), गौडप्पा संगप्पा बिराजदार (वय २२, रा. चडचण), चंद्गकांत सिध्दराम कोळी (वय १८, रा. लोणी बुदूक, इंडी), शंकरलिंग ग्यानप्पा जेऊर (वय २१, रा. अगरखेड, इंडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस शिपाई गणेश शिर्के यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे.

मोबाइलमुळे छर्रा मांडीला घासून गेला
सोरेगावजवळीलडॉ. कुंभार यांच्या दवाखान्याजवळील रस्त्यावर गावठी रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी चौघेजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एक पथक दबा धरून बसले होते. शनिवारी रात्री दहाच्या सुमाराला चौघेजण आले. संशयावरून त्यांना पकडले असता झटापट करून दुचाकीवरून पळून जाऊ लागले. एकाला पकडल्यानंतर त्याने गोळी झाडली. ती शिर्के यांच्या मांडीवर आदळली. खिशात मोबाइल असल्यामुळे घसरून ती गोळी बाजूला गेली. एक छरा मांडीला घासून गेला.

दुसरा तरुण हवालदार प्रवीण गाडे याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत शिर्के, गाडे, सहायक निरीक्षक बाळासाहेब शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचार करून सोडण्यात आले असून शिर्के यांच्यावर मात्र शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटकातून आलेल्या चौघांजवळील दोन गावठी रिव्हॉल्वर, चार जिवंत काडतुसे, एक उडालेली पुंगळी, दोन दुचाकी, चार मोबाइल जप्त करण्यात आले आहे.

त्यांचे रेकॉर्ड तपासत आहोत
त्या चौघांवर कर्नाटकात महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत का? याची तपासणी करत आहोत. चौघेजण सोलापुरात कुणाला रिव्हॉल्व्हर विकणार होते. उद्देश काय होता याची चौकशी सुरू आहे. सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासात आणखी माहिती समोर येईल. शंकरजिरगे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा