आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बाजारपेठांत गर्दी, पार्किंग, सुरक्षेसाठी घ्या काळजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दीपावली हा सर्वात मोठा सण चार दिवसांवर आला असून खरेदी करण्याकरता शहरातील मधला मारुती, नवी पेठेत गर्दी वाढत आहे. गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणे, मंगळसूत्र हिसकावणे, दागिने पळवणे अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. नवी पेठेत चार ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली असून नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत वाहनतळांच्या नियमांचे पालन केले तर अप्रिय घटना टाळता येतील. वाहतुकीच्या कोंडीमुळे होणारा मनस्ताप होणार नाही.
उत्सव काळात नवी पेठेत सर्वाधिक गर्दी असते. यामुळे लकी चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, शिंदे चौक मार्गांवर वाहतूक नियोजनाकरता बॅरिकेड्स लावण्यात येतील. इंदिरा कन्या प्रशाला, किल्ला बाग येथे दुचाकी सावरकर (आसार) मैदानजवळ चार चाकीकरता वाहनतळ असेल, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण दोरकर यांनी सांगितले. वाहतूक शाखेकडे वाढीव पोलिस देण्यात आले आहेत.

मधला मारुती भागात गर्दी असल्याने बाळीवेस ते कोंतम चौक मार्गावरील सिटीबस वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात येईल. वाहनतळाकरता पी-वन पी-टू मार्गाचा अवलंब करणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक सुनील घार्गे यांनी दिली. माणिक चौक, कोंतम चौक, बाळीवेस भागात बॅरिकेड्स लावून वाहतूक नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले.

असा आहे पोलिसांचा बंदोबस्त
पन्नासहूनअधिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. डीबी पथक, गुन्हे शाखेचे पथक, महिला पथक, साध्या वेशातील पोलिस आहेत. पाकीट चोरणे, मोबाइल पळवणे, दागिने हिसकावणे अशा घटना होऊ नये याकरता नागरिकांनी काळजी घ्यावी. अतिरिक्त बंदोबस्त असल्याचे नवी वेस पोलिस चाैकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी सांगितले.