सोलापूर - श्रावणातला शेवटचा सोमवार. पूर्वभागातील मंदिरांमध्ये भक्तीला उधाण आले होते. सकाळपासूनच रूद्राभिषेक, महापूजांना सुरुवात झाली. दुपारी उत्सवमूर्तींच्या रथातून मिरवणुका निघाल्या अन् मन मोहरून टाकणाऱ्या श्रावणसरी बरसल्या. त्याने उत्सवात अधिक रंगत आली. लेझीम, झांज पथकांतील तरुणाई वाद्यांवर थिरकली. पूर्वभागातील रस्त्यावरचे हे दृश्य होते. भक्तगणांनी रस्ते फुलले होते.
नीलकंठेश्वर रथ
श्रीमद्वीर शैव कुरुहिनशेट्टी (जाण्ड्रा) ज्ञाती संस्थेच्या वतीने नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन उत्सवमूर्तीची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. साखर पेठेतून दुपारी १२ वाजता त्यास सुरुवात झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उत्सवमूर्तीची पूजा केली. या वेळी समाजातील ज्येष्ठ तुकाराम मादगुंडी, विजयकुमार द्यावरकोंडा, शिवदत्त कुनी, दत्तात्रय पालमूर, वसंतराव आडकी, दत्तात्रय म्हंता, बालाजी येज्जा आदी उपस्थित होते. ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. कन्ना चौक, जोडभावी पेठमार्गे ही मिरवणूक निघाली. त्यात नीलकंठेश्वर प्रशालेतील विद्यार्थी भगवान शंकराच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. लेझीम आणि समूह नृत्याची पथकेही होती. पावसाच्या सरींनी उत्साह द्विगुणित झाला.
मडिवाळेश्वर रथ
मडिवाळेश्वर परीट ज्ञाती संस्थेच्या वतीने कन्ना चाैकातून मिरवणूक काढण्यात अाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पूजन केले. त्यानंतर कोंतम चौक, समाचार चौक मार्गे मिरवणूक निघाली. त्यात बँडपथक होते. ५० तरुणांच्या लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण केले. मिरवणुकीपूर्वी कन्ना चौकातील मंदिरात नऊ विश्वस्तांच्या हस्ते मूर्तीस रूद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली.
समाजाचे अध्यक्ष अर्जुन कानकुर्ती, उपाध्यक्ष अनिल कंदलगी, सचिव देविदास कुडगुंटे, शंकर दौलताबाद, नागनाथ बापट, चेतन नरोळे, आैदुंबर होनमुर्गी, विजय दौलताबाद आदी ज्ञाती संस्थेचे विश्वस्त या वेळी उपस्थित होते. किडवाई चौक, जेलरोड, जगदंबा चौक, जोडबसवण्णा, राजेंद्र चौकमार्गे या मिरवणुकीची कन्ना चौकातील मंदिरात सांगता झाली.
नीलकंठ समाजाची, पहिल्यांदाच पालखी
भवानी पेठेतील नीलकंठ समाजाने पहिल्यांदाच पालखी काढली. सकाळी १० वाजता खासदार अॅड. शरद बनसोडे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. या वेळी नगरसेवक अनिल पल्ली, उदयशंकर चाकोते, सुमन गदवालकर, सुरेखा अंजिखाने, मोहिनी पतकी, रोहिणी तडवळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. घोंगडे वस्ती परिसरातून ही मिरवणूक निघाली. त्यात समाजाचे अध्यक्ष कृष्णाहरी चिंता, नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीहरी ईराबत्ती, विजयकुमार द्यावरकोंडा, देविदास कालवा आदी सहभागी झाले होते.
श्रीमद् वीरशैव कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीने सोमवारी रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी जल्लोष केला. मडिवाळेश्वर परीट ज्ञाती संस्थेतर्फे काढलेली रथ मिरवणूक.