आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची बाजारात लूट, जीएसटी क्रमांक नसतानाही दरवाढीचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जीएसटी करप्रणालीच्या नावाखाली बाजारात ग्राहकांची काही व्यापारी, व्यावसायिकांकडून लूट सुरू आहे. रस्त्यावर बसून कपडे, चपला विक्री करणारेही जीएसटीची भीती दाखवून ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधितांनी जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केली आहे की नाही, याची तपासणी अद्यापही कोणत्याच यंत्रणेने केलेली नाही. 
 
केंद्र शासनाने जीएसटी कायदा लागू केल्यावर यावर सकारात्मक नकारात्मकही मोठी चर्चा देशात घडवून आणण्यात आली. या चर्चेचे लोन गल्लीपर्यंतही पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक जीएसटीमुळे करचोरी रोखली जाणार असल्याचा दावा करत आहे. तर विरोधक दर वाढल्याची टीका करत आहेत. मात्र, हाच धागा पकडून काही व्यापारी, छोटे व्यावसायिक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. कायद्याची कोणतीच माहिती नसताना याचा आपल्या हितासाठी वापर करून घेतला जात आहे. शहरातील काही मुख्य व्यापारी व्यावसायिक सोडले तर अनेकांनी या कायद्याअंतर्गत अद्यापही नोंदणी केलेली नाही. वास्तविक याची व्यापारी नोंदणी करून जीएसटी क्रमांक मिळवला जातो. असा कोणताही क्रमांक प्राप्त केलेले व्यापारी व्यावसायिक थेट जीएसटीच्या नावाखाली आपला माल अधिक दराने खपवत आहेत. यामध्ये कापड, खाद्यपदार्थ, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, वह्या, पेन, पान मटेरीयल, चहापत्ती, फर्निचर आदी पदार्थांच्या विक्रेत्यांचा समावेश आहे. दर वाढल्याचे कारण विचारल्यावर कोणताही व्यावसायिक थेट जीएसटीचे कारण सांगत आहेत. ग्राहकांनाही याचे अधिक ज्ञान नसल्यामुळे त्यांचा हात निमूटपणे खिशाकडे जात आहे. अशी लुबाडणूक थांबवण्यासाठी आतापर्यंत तरी कोणतीही यंत्रणा अद्याप पुढे आलेली नाही. 
 
सक्षम यंत्रणेची गरज 
ग्राहकांची जिल्ह्यात अशी सुरू असलेली लुबाडणूक थांबवण्यासाठी शासनाची कोणतीही यंत्रणा पुढे आलेली नाही. आतापर्यंत व्यापारी व्यवसायिकांमध्ये जीएसटीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांमध्ये अशी जनजागृती अद्यापही होऊ शकलेली नाही. यामुळे ग्राहकांना फसवण्याचा प्रकार होत आहे. 
 
तपासण्या करा 
ग्राहकांना जीएसटीची काहीही माहिती नाही. याचा गैरफायदा घेऊन जीएसटी कक्षेत नसलेले विक्रेतेही ग्राहकांना जादा दराने मालाची विक्री करत आहेत. यासंदर्भात तत्काळ तपासणी होणे आवश्यक आहे. 
- सचिन कोरे, ग्राहक. 
 
रस्त्यावरचे विक्रेतेही जोमात 
रस्तावर बसून माल विकणारेही जोमात आहेत. विचारणा केली तर जीएसटी म्हणजे नेमके काय, हे पण सांगता येत नाही. मात्र, जीएसटीमुळे दर वाढलेत, दर कमी करता येणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगत आहेत. जीएसटीच्या अतिरेकी चर्चेमुळे ग्राहक चांगलेच हबकले आहेत. 

ग्राहकांनी हे करावे 
जीएसटीमुळे वस्तूंचे दर अधिक सांगितले जात असल्यास जीएसटीप्रमाणे पावती मागावी. या पावतीवर एस जीएसटी, सी जीएसटीचा वाटा, जीएसटी क्रमांकाचा छापील मजूकर असतो. अशी पावती मिळाली तरच संबंधित विक्रेता जीएसटीच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यानंतर ग्राहकांना विक्रीकर अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येईल. 
बातम्या आणखी आहेत...