आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलंकार, इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदीकडे कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दसरा दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा या उक्तीस अनुसरूनच बाजारपेठेत चित्र आहे. सोन्याच्या अलंकारांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याकडे सोलापूरकरांचा कल दिसून येत आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एसी, एलईडी, वॉशिंग मशिन, फ्रीज, कुलर्स आदींच्या खरेदीची धूम असून या वस्तू खरेदी करण्यात फायनान्स कंपन्या आणि बँकांची मदत होत आहे. केवळ एक रुपया भरा आणि वस्तू घरी घेऊन जा अशा स्किम्स आल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे नॅशनल इलेक्ट्रॉनिक्सचे आनंद मनवानी यांनी सांगितले. तसेच जुन्या फ्रीजवर एक्सेंज ऑफर, एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री अशा गोष्टींमुळे ग्राहकही आकर्षित होत आहे. सध्यास एलईडी टीव्हीची क्रेझ आहे. दसऱ्याच्या दिवशी २१ ते ४२ इंचापर्यंतचे किमान हजार टीव्ही खरेदी होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

ग्राहकांसाठी विविध स्किम
सराफीपेढ्यांमध्येही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा मुहूर्त साधण्याचा ग्राहकांचा कल आहे. काही पेढ्यांनी सोन्या चांदीच्या अलंकारांवर मजुरी घेतली जाणार नाही, असे जाहीर केले आहे, तर काहीनी कमी वजनातील दागिने उपलब्ध केल्याने या मुहूर्तावर सोने खरेदीकडेही कल असेल. महालक्ष्मी ज्वेलर्सचे धाराशिवकर यांनी बुधवारी १० ग्रॅम सोन्यास २७ हजार ३५० रुपये तर एक किलो चांदीस ३७५०० रुपये दर असल्याची माहिती दिली. दसऱ्याला या दरात काही प्रमाणात वाढ होईल असे सांगितले. ऐन सणाच्या तोंडावर सोन्याचे दर उतरल्याने खरेदीत सकारात्मकता दिसेल, असे ते म्हणाले.

खुली जागा, तयार घरांवर आहे सूट
२१ हजार रुपये भरा जागा बुक करा, आज जागा किंवा फ्लॅट बुक करा १० टक्के सूट मिळवा, बुकिंगवर सोन्याचांदीची नाणी फ्री, एक जागा घेतल्यावर तीन गृहोपयोगी वस्तू मोफत अशा विविध योजना रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू आहेत. त्यामुळेही विविध प्रकल्पांकडे चौकशीचे फोन जात असून, आपल्या बजेटमध्ये मनाजोगा पसंतीक्रम ग्राहक घेईल, असे विनय कन्स्ट्रक्शनचे चंद्रशेखर अक्कलकोटे यांनी सांगितले.