(फोटो - डॉ. पूजा गाेयल)
सोलापूर- दयानंद महाविद्यालयाची व्याप्ती, पायाभूत सुविधा विविध अभ्यासक्रमांची उपलब्धता पाहता यूजीसी या महाविद्यालयास स्वायत्त विद्यापीठ म्हणून मान्यता देऊ शकेल, त्यादृष्टीने राज्याची -राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान- ‘रूसा’ टीमही मार्गदर्शन देईल, स्वायत्त विद्यापीठाद्वारे गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची व्याप्ती वाढविता येऊ शकते. स्वतंत्र निर्णय घेत गुणवत्ता राखता येऊ शकते, सुमारे ५५ कोटी रुपये स्वायत्त विद्यापीठाच्या चालनेसाठी योजनेंतर्गत मिळूही शकतात, अशी माहिती रूसाच्या राज्य टीममधील सिनिअर कन्सलटंट डॉ. पूजा गाेयल यांनी दिली.
ही टीम नुकतीच सोलापूर विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांच्या भेटी पाहणीसाठी सोलापुरात आली होती. यानिमित्त त्यांनी सोलापूर विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयाच्या दर्जा ताकदीबाबबतही निरीक्षण नोंदविले.
डॉ. गोयल म्हणाल्या, स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची संकल्पना राबविणे शक्य होते. रूसा म्हणजे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान अंतर्गत जर संलग्नित सक्षम संस्थेने स्वायत्त विद्यापीठाचा प्रस्ताव दिला तर भरीव मदतही उपलब्ध होऊ शकते. मात्र संस्थेची तयारी हवी. त्यांनी होकार दिला तर रूसाच्या राज्य टीमकडून मार्गदर्शनही मिळू शकेल. जर २५ किलोमीटरच्या परिसरातील सक्षम अशी एकाहून अधिक महाविद्यालये एकत्रित आली त्यांनी स्वायत्त विद्यापीठाची संकल्पना एकत्रित रित्या स्वीकारली तरीही या महाविद्यालयांना एकत्रित स्वायत्त विद्यापीठ स्थापता येईल. अर्थात सोलापूर विद्यापीठानेही गुणवत्ता पूर्ण महाविद्यालयांना स्वायत्त विद्यापीठ स्थापनेसाठी प्रोत्साहित करणे अभिप्रेतही आहे. गुणवत्ता आणखी वाढण्यासाठी विविध महाविद्यालये एकत्रित येऊनही स्वायत्त विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल करू शकतात.
अॅकॅडमिक स्वायत्तता हवी, आर्थिक स्वायत्तता कशी मिळणार ?
स्वायत्त विद्यापीठस्थापनेसाठी दयानंद महाविद्यालय सक्षम असले तरी अॅकॅडमिक स्वायत्तता आणि आर्थिक स्वायत्तता या दोन्हींचा विचार एकत्रित करणे योग्य ठरेल. गुणवत्ता वाढविण्यासाठी दर्जेदार प्राध्यापकांची गरज भासते. मात्र प्रश्न आर्थिकशी निगडित आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना अॅकॅडमिक आर्थिक स्वायत्तता प्राप्त करणे तुलनेने सोपे आहे, मात्र पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना वेतनाच्या भक्कम आर्थिक पाठबळासाठी शासनाच्या मान्यतेचीच गरज भासेल. त्यामुळे स्वायत्त विद्यापीठ स्थापनेपूर्वी आर्थिक स्वायत्तता प्रदान करण्यासाठी शासनाने ठोस योजना दिली तर अॅकडमिक स्वायत्तताही संस्था घेऊ शकते. विचार मंथनातून स्वायत्त विद्यापीठांसमोरील अडचणी दूर करताही येतील. परदेशातील स्वायत्त विद्यापीठांना सर्वच स्तरातून म्हणजे सामाजिक शासन या माध्यमातून भक्कम आर्थिक पाठिंबा मिळत असतो. आपल्याकडील परिस्थिती वेगळी आहे.” डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, प्राचार्य,दयानंद महाविद्यालय