आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decoration Open To Public, Administration Ready For Ganesh Idol Immersion

देखावे झाले खुले, प्रशासनाने केली विसर्जनाची जय्यत तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी पोलिस, महापालिका आणि मध्यवर्ती मंडळे यांच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. बुधवारी पोलिसांनी दोन मध्यवर्ती मंडळांच्या मार्गांची पाहणी केली. धर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव येथील विसर्जन घाटावरील तयारीही पूर्णत्वाला आली आहे. महिलांनी या उत्सवाच्या काळात कशी काळजी घ्यावी याविषयी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी १५ मुद्दे जाहीर केले आहेत. दरम्यान, देखावे पाहण्यास गणेशभक्त घराबाहेर पडू लागले आहेत. शहरातील बहुतेक मंडळांचे देखावे पाहण्यास खुले झाले आहेत.

रविवारी उत्सवाची मिरवणुकीने सांगता होणार आहे. त्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. बुधवारी नियोजनाच्या दृष्टीने लोकमान्य, मध्यवर्ती पूर्वभाग मध्यवर्ती गणपती उत्सव मिरवणूक मार्गांची पाहणी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त बालसिंग रजपूत आदी अधिकाऱ्यांनी केली. मार्गांवरील काही समस्या, अडथळे याबाबत उपाययोजना सूचनांची नोंद घेण्यात आली. मुख्य समस्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची आहे. शनिवारपर्यंत खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

पोलिसांकडून सुरू आहे दररोज नाकाबंदी
गणपतीउत्सव पार्श्वभूमीवर भय्या चौक, सात रस्ता, गांधी नगर भागात दररोज अचानक नाकांबदी करून वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाहनांची कागदपत्रे, वाहन परवाना, विमा, पीयूसी आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे. नियमानुसार कागदपत्रे नसल्यास दंडात्मक कारवाई होत आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळसूत्र दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिस विविध उपाययोजना करून चोरांवर लक्ष ठेवून आहेत.

बकरी ईदसाठी मोठा बंदोबस्त
शुक्रवारीबकरी ईदसाठी तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. दोन आयटीबीपी पथक, बावीसशे स्थानिक पोलिस, चारशे होमागार्ड महिला पुरुष, नाशिकहून आलेले दहा फौजदार, दोन डीसीपी, चार एसीपी, चोवीस पीआय आणि दीड हजार महाविद्यालयीन तरुण आणि पोलिस-छात्र मित्र योजनेचे सदस्य असा ताफा बंदोबस्तासाठी असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांनी दिली.
दागिने घालून बाहेर पडण्याचे पोलिस आयुक्तालयाकडून आवाहन
मंगळसूत्रचोरी, पोलिस असल्याचे सांगून दागिने पळवणे यासारख्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे पंधरा मुद्द्यांच्या आधारे नागरिकांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे याप्रमाणे : बाजारात, नातेवाइकांकडे जाताना दागिने घालू नका, घातल्यास स्वत:च काळजी घ्या. पत्ता विचारण्याचा बहाणा करून दागिने पळवण्यात येते. दागिने पदराखाली घ्या अथवा पीन लावा. पुढे खून झाला आहे, मी पोलिस आहे दागिने काढून ठेवा, असे सांगत दागिने नेतात. विशेष म्हणजे पोलिस अशा सूचना देत नाहीत. असा प्रकार घडल्यास नागरिकांची मदत घ्या, पोलिसांशी संपर्क साधा. प्रवासात दागिने घालू नका, अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ खाऊ नका. एटीएम, ऑनलाइन बँकिंगचे पासवर्ड सांगू नका. मोबाइलवरून आपल्या बँक बॅलन्सबाबत माहिती देऊ नका, सोसायट्या, कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्या. संशयित वस्तू दिसल्यास माहिती द्या.