आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: हवामान अभ्यासासाठी दीप्ती जातेय इटलीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरची कन्या दीप्ती कल्याणशेट्टी-हिंगमिरेची भारत सरकारने इटली अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान खात्याचा अभ्यास करण्यास भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातून तिची निवड झालेली आहे. पुण्याच्या हवामान विभागात दीप्ती भारतीय हवामान या विषयावर संशोधन करत आहे. तिच्या या निवडीबाबत दीप्तीच्या आई-बाबांना आनंद झाला आहे. त्यांनी कन्येचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

लहानपणापासून सामाजिक विषयाचे भान असणारी दीप्ती प्रत्येक वर्षी गडचिरोलीला जाऊन आदिवासी लोकांना त्यांच्या मागण्यांची जाणीव करून देणे, अंधश्रद्धांपासून त्यांना रोखणे, आरोग्यविषयक जागृती करणे, डॉ. अभय बंग राणी बंग यांच्या निमा तर डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबत काम केले आहे. यावरू दीप्ती हिला सामाजिक विषयांची प्रखर जाणीव असल्याचे दिसून येते.

दीप्तीचे शालेय शिक्षण सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कन्या प्रशालेत झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले. अभियांत्रिकीची पदवी तिने सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून मिळवली. तिने पुणे विद्यापीठातून एम.टेक केले. ती सध्या पुणे विद्यापीठ हवामान खाते यांच्यामार्फत भारतीय मान्सून मॉडेलिंग या विषयावर संशोधन करत आहे. सध्या ती पुण्यात वास्तव्यास असून तिचे पती स्वप्नील हिंगमिरे पुण्यातील नामांकित कंपनीत इंजिनिअर आहेत.

आई-बाबांची साथ महत्त्वाची
वडील विश्वनाथ कल्याणशेट्टी हे श्री दिंगबर जैन गुरुकुल प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. या दोघांनी आणि पतीने खूप साथ दिली म्हणून मी अशा अवघड विषयात यश प्राप्त करत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इटलीला जातेय याच मला अभिमान वाटत आहे. हे काम आता वेगाने पुढे नेणार आहे. दीप्ती कल्याणशेट्टी हिंगमिरे, मान्सून संशोधक

असे आहे दीप्ती करत असलेल्या संशोधनाचे स्वरूप
मान्सूनचीसद्यस्थिती, त्यातील बदल, बदलाचे विवेचन आणि त्याची कारणे या विषयावर दीप्ती संशोधन करत आहे. त्यानुसार देशात आणि जगाच्या हवामानात होणारे बदल त्यातून निर्माण होणारे इतर अनेक बदल यांचा यात समावेश आहे.