आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Democracy Day Occasion Action Report On Complaining

लोकशाही दिनातील तक्रारींवर कारवाईचा अहवाल त्वरित द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकशाहीदिनात अनेक तक्रारी येतात, परंतु त्या लोकशाही दिनाच्या निकषात बसत नाहीत. त्यामुळे सदरच्या तक्रारी निवेदन म्हणून स्वीकारत संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. तक्रार अर्जाबाबत कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन झाल्यानंतर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुंढे यांनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत आवश्यक असलेली माहिती विविध प्रपत्रात देण्यात यावी. ही माहिती लोकशाही दिनाच्या अगोदरच्या शुक्रवारपर्यंत देण्यात यावी. या अर्जाबाबत सर्व जिल्हाप्रमुखांनी दरमहा आढावा घ्यावा. जास्तीत जास्त माहिती स्वत:हून वेबसाइटवर टाकण्यात यावी. विविध विभागांकडील प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क अधिनियम हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्राधान्याचा कार्यक्रम आहे. विविध विभागांनी ज्या सेवा या अंतर्गत जाहीर केल्या आहेत. त्या मुदतीत निकाली काढण्यात याव्यात. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मंजुरीबाबत ३१ मार्चपर्यंत निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सर्व सिंचन प्रकल्पातील गाळ लोकसहभागाद्वारे काढण्याचे नियोजन करावे. जलयुक्त शिवार अभियानांतून सिंचन दुरुस्तीचे अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचनाही श्री. मुंढे यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांच्या २०१६-१७ च्या आराखड्याबाबतही मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबाबतच्या समिती अंतर्गत जलआराखडा सिंचन सूक्ष्म सिंचन कसे वाढेल याबाबतचे नियोजन केले जाणार असल्याचे श्री.मुंढे यांनी सांगितले. बैठकीत विविध विभागांचे इतर विभागांशी परस्पर निगडित प्रकरणाबाबत चर्चा होऊन याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.मुंढे यांनी दिले.

शासनाच्या सूचनेनुसार कार्यक्रम करा...
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ठरलेल्या वेळेत सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. विविध पथकाचे प्रभावी शिस्तबद्ध संचलन, विविध शासकीय योजनेवर आधारित चित्ररथ तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांबाबतची माहिती १५ जानेवारीपर्यंत द्यावी. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनपूर्वक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिल्या.