आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता लोहारा, वाशीची गाडी येणार विकासाच्या मार्गावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा-वाशी - तालुका म्हणून मान्यता मिळून १६ वर्षे झाली तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा वाशी या दोन तालुक्यांची विकास कामांअभावी मोठ्या खेड्याप्रमाणेच अवस्था होती. परंतु, नुकताच मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही तालुक्यांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. यावेळी नागरिकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच नगरपंचायतीच्या दर्जामुळे किमान शहरांतर्गत विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळेल आणि या दोन गावांची विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोहारा तालुक्याची निर्मिती २२ जुलै १९९९ रोजी करण्यात आली. त्याचवेळी जिल्ह्यातील वाशी तालुक्याचीही निर्मिती करण्यात आली. परंतु, निर्मितीच्या १६ वर्षानंतरही या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणांचा काहीच विकास झाला नाही. विशेष म्हणजे तालुक्याचे ठिकाण असूनही या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फतच कारभार पाहिला जात होता. त्यामुळे विकासकामे करण्याबरोबरच गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही तालुक्यांना नगरपंचायतचा दर्जा दिल्याची घाेषणा केली. यामुळे विकासकामांना गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत अाहे. वाशी लोहाऱ्याच्या पाणीप्रश्नाबाबत मार्ग काढणे सोपे होणार आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री अध्यादेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्याची चर्चा पसरताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नगरपंचायतच्या निर्णयाचे स्वागत आहे. यामुळे होणाऱ्या विविध सुधारणांमधून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. '' सतीश शेरकर, शहरप्रमुख शिवसेना.